

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत आघाडीबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट तसेच अन्य समविचारी पक्ष एकत्र आले, तर त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट करत, नाराजी घरात चालते, पण समाजात काम करताना नाराजी ठेवता येत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना लगावला. तसेच पक्षाचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुळे यांनी पक्ष कार्यालयास भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांनी महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला.
यानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांच्याशी सहा तास चर्चा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्याशीही वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा सुरू आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तोच निर्णय स्वीकारतील.
सुळे म्हणाल्या, सोनिया गांधी यांच्या विरोधात शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्ष सोडला होता. मात्र आघाडीसाठी जागा कमी पडू लागल्यावर सोनिया गांधी यांनी स्वतः घरी येऊन 'आघाडीत या' अशी विनंती केली होती. त्यामुळे राजकारणात नाराजी ठेवून चालत नाही, हे यावरून स्पष्ट होते.
पुण्याच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे, असे मत सुळे यांनी व्यक्त केले. त्यासाठी पक्षांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करत आहेत.
“पुण्यात खरोखर बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याशी चर्चा सुरू आहे,” असेही सुळे यांनी स्पष्ट केले.