सांगवी : उसाच्या लागवडी खोळंबल्या; शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे

सांगवी : उसाच्या लागवडी खोळंबल्या; शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे

अनिल तावरे

सांगवी(पुणे) : यंदाच्या पावसाळ्यातील अख्खा जून महिना अपवाद वगळता बारामती तालुक्यात कोरडा गेला. समाधानकारक पाऊस पडेल, या आशेवर शेतकर्‍यांनी विविध प्रकारच्या पेरण्यांसाठी बियाणे खरेदीसह उसाच्या लागवडीसाठी सर्‍या काढून तयार आहेत. मात्र, ऐन पावसाळ्यातील अख्खा जून महिना पावसाअभावी कोरडा गेला आहे. पाण्याअभावी विहिरी आटल्या असून, विंधनविहिरीही बंद पडल्या आहेत. आकाशात मात्र दररोज काळ्याकुट्ट ढगांची दाटी होताना पाहायला मिळत आहे. परंतु, पाऊस काही पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर चिंतेच्या ढगांची दाटी होताना दिसत आहे.

विहिरी आटल्या, विंधनविहिरीही बंद

तालुक्यातील बहुतांश भागांतील शेतातील विहिरींच्या व कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे.काही विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांचे वर्षभराचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यातील संपूर्ण जून महिना कोरडा गेला असल्याने प्रत्येक शेतकरी चिंताग्रस्त होऊन बसला आहे.

बारामती तालुक्यातील काही भाग जिरायती पट्ट्यात, तर काही भाग बागायती पट्ट्यात येतो. तालुक्यात यंदा अपवाद वगळता पूर्व मोसमी व मान्सूनचा एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी विविध प्रकारचे बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. बागायती पट्ट्यात जूनपासून उसाच्या लागवडीसाठी साखर कारखान्यांच्या वतीने परवानगी दिली आहे.

त्यामुळे बागायती पट्ट्यातील हजारो एकर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी उसाच्या लागवडीसाठी सर्‍या काढून ठेवल्या आहेत. परंतु धरणक्षेत्रातही पाऊस कमी प्रमाणात सुरू झाला असून, यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरतील की नाही याच विवंचनेत सध्या तरी शेतकरी अडकले आहेत. संपूर्ण जून महिन्यात शुक्रवारी (दि. 30) दुपारी 4 पर्यंत मोठा पाऊस झाला नव्हता.

तालुक्यातील जिरायती भागात विविध प्रकारच्या पेरण्या केल्या जातात. परंतु समाधानकारक पाऊसच पडत नसल्याने शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. बागायती पट्ट्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात, तर काही शेतकरी उसाच्या लागवडीत आंतरपीक म्हणून सोयाबीनची टोपणी करतात. अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनसह इतर बियाणे खरेदी करून बियाणांवर प्रक्रिया करून पेरणीसाठी तयारी करून ठेवली आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news