

काटेवाडी: बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी हार्वेस्टर मशीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही यंत्रणा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मजुरांची टंचाई, वाढता खर्च आणि वेळेची बचत आणि ऊसतोडीवेळी पाचटाची कुटी होते. या पार्श्वभूमीवर ऊसतोड यंत्रांचा वापर वेगाने वाढत आहे.
ऊसतोडीसाठी परंपरेने बीड, अहिल्यानगर आदी भागांतील मजूर मोठ्या संख्येने येतात. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे. याचा थेट परिणाम ऊसतोडीवर होत असल्याने कारखान्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनचा पर्याय स्वीकारला आहे. छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांसाठी चालू हंगामात 28 हार्वेस्टर मशीनविक्री झाली आहेत.
हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने ऊसतोड केल्यास कांड्या गोळा करण्यासाठी लागणारा मजुरी खर्च कमी होतो. त्याचबरोबर मशीनमधून निघणारा पालापाचोळा बारीक कुट्टी स्वरूपात शेतातच पसरतो. यामुळे सेंद्रिय खतनिर्मिती होऊन जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे पालापाचोळा पेटवण्याची गरज राहत नाही, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत आहे.
काटेवाडी-सोनगाव परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर या यंत्रांचा वापर करताना दिसत आहेत. कमी वेळेत ऊसतोड पूर्ण होत असल्याने शेत लवकर रिकामे होते. परिणामी खोडवा तसेच दुसऱ्या पिकासाठी खताचे प्रमाण कमी लागते आणि ऊसपिकाची वाढ जोमाने होत आहे. ऊस लवकर कारखान्यापर्यंत पोहोचत असल्याने वजन व उतारा यामध्येही फायदा होत आहे.
श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 14 हार्वेस्टर मशीन यंत्रणेच्या माध्यमातून ऊसतोडणी सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचत आहेत. पूर्वी एक एकर ऊसतोडीसाठी मजुरांना तीन ते चार दिवस लागत होते, तर आता हार्वेस्टर मशीनमुळे अवघ्या चार ते पाच तासांत एक एकर क्षेत्राची ऊसतोड पूर्ण होत आहे. ऊसतोड मशीनमुळे वेळेची बचत, खर्चात कपात आणि जमिनीच्या सुपीकतेत वाढ असा तिहेरी फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परिणामी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टर मशीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत मजुरांची कमतरता ही मोठी अडचण आहे. हार्वेस्टर मशीनमुळे शेतकऱ्यांचा ऊसतोडीचा खर्च कमी होत असून, वेळेची मोठी बचत होत आहे. पालापाचोळ्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता वाढवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा थेट फायदा होत असून, ऊसतोड मशीनला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
विद्याधर काटे, हार्वेस्टर विक्रेते, बारामती- इंदापूर