

काटेवाडी : सपकाळवाडीच्या (ता. इंदापूर) संजयनगर येथील तरुण शेतकरी शुभम धनंजय थोरात पारंपरिक ऊसशेतीला बगल देत अंजिराची बाग फुलवली आहे. प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकर क्षेत्रात अंजिराचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.
सुरुवातीला मशागत, रोपे, ठिबक सिंचन, खते व अन्य बाबींवर 75 हजार रुपये खर्च झाला. लागवडीनंतर अवघ्या एका वर्षातच चांगली फळधारणा झाल्याने पहिल्याच हंगामात एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता समाधानकारक नफा मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आणि त्याच जोरावर 2 महिन्यांपूर्वी आणखी अर्धा एकर क्षेत्रात अंजिराची लागवड करण्यात आली.
या यशामागे सासवड येथील संजय क्षीरसागर व नाना राऊत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे थोरात यांनी सांगितले. सध्या सुरुवातीला लागवड केलेल्या बागेत मोठ्या प्रमाणात फळधारणा सुरू असून, कडाक्याच्या थंडीपासून तसेच पशू-पक्ष्यांपासून संरक्षणासाठी बागेवर जाळी (नेट) लावण्यात आली आहे.
अंजिराची फळे दर्जेदार असल्याने वडील धनंजय थोरात स्वतः ऑर्डर घेऊन थेट परिसरात विक्री करीत आहेत. त्यामुळे दलालांचा खर्च टळून चांगला दर मिळत आहे. उसाच्या तुलनेत पर्यायी पिकातून उत्पन्नात लक्षणीय वाढ होत असल्याचे या प्रयोगातून दिसून येते.
कमी क्षेत्रात, कमी कालावधीत व योग्य व्यवस्थापनातून मिळणारे उत्पन्न पाहता अंजीर लागवड शेतकऱ्यांसाठी नफा देणारा पर्याय ठरत असल्याचे या यशस्वी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.
थोरात यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी अंजीर लागवडीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.