

वेल्हे : फिरण्यासाठी आलेल्या मित्रांच्या ग््रुापमधील एका 30 वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वेल्हे तालुक्यातील माणगाव येथे घडली. सद्दाम चांद व्हसुरे (वय 30, रा. नांदेड सिटी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
सद्दाम व्हसुरे हा त्याचे मित्र नितीन पुंडे, प्रकाश माळी, अनिल ओवाळ आणि राहुल गायकवाड यांच्यासोबत राहुलच्या चारचाकी गाडीतून राजगड तालुक्यातील माणगाव येथे फिरण्यासाठी आला होता. माणगाव हे प्रकाश माळी यांचे सासरवाडी असल्याने सर्वजण तिथे गेले होते. दुपारच्या वेळी हे सर्व मित्र माणगावजवळील धरणाच्या कडेला बसले होते. यावेळी त्यांनी सोबत आणलेली भेळ खाल्ली आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, सद्दाम हा धरणाच्या खोल पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्याने तो पाण्यात बुडू लागला.
सद्दाम पाण्यात बुडत असल्याचे पाहून प्रकाश माळी याने तातडीने पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. बाहेर काढले तेव्हा सद्दाम बेशुद्धावस्थेत होता. मित्रांनी त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मित्रांनी तातडीने पानशेत पोलीस चौकशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सद्दामला तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.