

शेळगाव : यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यात अनेक भागांत झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे फळबाग शेतीवर गंभीर परिणाम झाला आहे. डाळिंब, पेरू, द्राक्ष, सीताफळ, भाजीपाला तसेच मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे फळबागांना घरघर लागली आहे. परिणामी शेतकरी वर्ग सध्या चिंतेत सापडला आहे.
तालुक्यात काही वर्षांपूर्वी उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र, साखर कारखान्यांकडून मिळणारे कमी दर आणि वेळेवर न मिळणारी उसाची बिले यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे शेळगाव, बोरी, लासुर्णे, काझड, निमगाव केतकी, वरकुटे आदी भागांत उसाला पर्याय म्हणून मागील काही वर्षांत द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ यांसह विविध फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.
मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून सततच्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे या फळबागांवर तीव रोगराईचा शिरकाव झाला आहे. त्यातच औषधे व खतांचे वाढते दर, घटलेले उत्पादन आणि कमी बाजारभाव यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जादा पावसामुळे मका तसेच भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या पेरू व सीताफळाचे बाजारभाव घसरले असून, डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट कायम आहे. त्यामुळे काही भागातील शेतकरी फळबागा काढून त्या ठिकाणी अन्य पिकांची लागवड करण्याकडे वळू लागले आहेत.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे माजी अध्यक्ष भारत शिंदे (बोरी) तसेच द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी मोहन दुधाळ (शेळगाव) यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यात 20 मे 2025 नंतर सुरू झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये अपेक्षित फलधारणा झाली नाही. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने चालू द्राक्ष हंगाम सुमारे 50 ते 60 टक्के फेल गेला आहे.
दरम्यान, चालू वर्षी उसाला 3200 ते 3300 रुपये प्रतिटन असा चांगला दर मिळाल्याने ऊस शेतीला काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्यास इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा ऊस क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.