Pune News : यंदा साखर कारखान्यांची कसोटी; शेतकर्‍यांचा कल गुर्‍हाळांकडे

Pune News : यंदा साखर कारखान्यांची कसोटी; शेतकर्‍यांचा कल गुर्‍हाळांकडे

खोर(पुणे) : पावसाने पाठ फिरवल्याने यंदाचा गळीत हंगाम दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे. अपुर्‍या उसाचा फटका गळीत हंगामाला बसण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यात भीमा सहकारी, दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर्स हे चार साखर कारखाने आहेत. सन 2022-23 मध्ये भीमा पाटस कारखान्याने 2750 रुपये बाजारभाव दिला. शेवटचा हप्ता पूर्ण करून 2850 रुपये देण्यात येणार आहे. दौंड शुगरने 2800 रुपये बाजारभाव दिला. शेवटचा हप्ता पूर्ण करून 2925 देण्यात येणार आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने 2750 बाजारभाव दिला.अनुराज शुगर्सने 2500 रुपये एवढा बाजारभाव दिला.

गत हंगामात भीमा-पाटसने 3 लाख 12 हजार 215 टन, दौंड शुगरने 10 लाख 3 हजार टन, श्रीनाथ म्हस्कोबाने 6 लाख 30 हजार 811 टन, अनुराज शुगर्सने 3 लाख 25 हजार 731 टन उसाचे गाळप केले. मात्र, साखर कारखान्यांना या वर्षी कारखाने सुरू करण्यास व गाळप हंगाम पूर्ण करण्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

ऊस लागवड क्षेत्र घटल्यास या वर्षीचा गळीत हंगाम पूर्ण करणे कारखान्यांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. भीमा पाटस चालू हंगामात 10 लाख टनाचे गाळप करणार, असे सांगत आहे. दौंड शुगरने असेच उद्दीष्ट जाहीर केले आहे. ते पूर्ण करणे आव्हानात्मक ठरणार आहे.
गुर्‍हाळावर उसाला 2900 ते 3000 इतका प्रतिटन बाजारभाव दिला जात आहे. गुर्‍हाळावर ऊस गेल्याने एक रकमी पैसेदेखील शेतकर्‍यांना मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळला आहे. त्यातच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व हुमणीमुळे उसाचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. जवळपास 30 ते 40 टक्के घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम साखर कारखान्यांना आव्हानात्मक ठरणार आहे.

दौंड तालुक्यात यंदा सरासरी 15 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 14 हजार 810 हेक्टरवर आडसाली ऊस लागवड करण्यात आली आहे. जवळपास 200 हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. त्यातच आहे तो ऊस जनावरांच्या चार्‍यासाठी काढला जात आहे.

– राहुल माने, कृषी अधिकारी, दौंड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news