काका – पुतण्यात चढाओढ | पुढारी

काका - पुतण्यात चढाओढ

– विजय लाड, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार यांचे एकामागे एक डाव – प्रतिडाव पडत आहेत. राष्ट्रवादीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि कायम सत्ताधीश राहण्यासाठी काका- पुतण्यामधील ही चढाओढ आता कोणत्या टोकाला जाईल हे सांगणे अवघड आहे.

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस बाहेर पडली. परंतु, शरद पवार यांची खेळी यशस्वी ठरली. अजित पवार गटाला माघार घ्यावी लागली. तरीही राष्ट्रवादीतील हा असंतोष एका मोठ्या उद्रेकाला जन्म देणार असल्याचे जवळपास पक्के झाले. या घडामोडीनंतरही अजित पवार गट राष्ट्रवादीत अतिशय सक्रिय होता. या गटाची सत्ताधार्‍यांशी असलेली जवळीक वारंवार प्रकर्षाने समोर येत होती. ही जवळीक भविष्यातील बदलांची नांदी ठरेल याची हळूहळू जाणीव होऊ लागली.

अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे -पाटील आदी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यास शरद पवार यांचा आधीपासून विरोध होता. त्यामुळे शरद पवार या नेत्यांसोबत असण्याचा प्रश्नच नव्हता. शरद पवार यांचे राजकारण अगदी सुरुवातीपासून सर्वधर्म समभावावर आधारित राहिले आहे. अगदी अखेरच्या टप्प्यावर असताना या राजकारणाला छेद देणे त्यांना शक्य नाही. खुलेपणाने अशी भूमिका जाहीर करणे हे शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला शक्य नाही.

भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध असावेत, राजकारणाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपसोबत संबंध ठेवावेत इतपत ठीक आहे. परंतु, थेट पाठिंबा देत सत्तेत सहभागी होणे शरद पवार यांना शक्य नाही याची जाणीव अगदी अजित पवार गटालाही आहे. परंतु, शरद पवार यांचा किमान बाहेरून आशीर्वाद मिळावा, त्यांची नाराजी दूर व्हावी, यासाठी अजित पवार गटाने सुरुवात केली. कारण शरद पवार यांना नाराज करून राष्ट्रवादीला एकसंध ठेवणे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवणे शक्य नसल्याची जाणीव अजित पवारांना आहे. त्यामुळे अजित पवार गटाने शरद पवार यांची समजूत घालण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केला. शरद पवारांनी किमान अजित पवार गटाविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त करू नये, तशा सभा घेऊ नयेत, तशी वक्तव्ये देऊ नयेत या दिशेने अजित पवार गटाने चर्चा सुरू केली. परंतु, शरद पवारांनी आपली भूमिका जनतेसमोर ठेवण्यात सुरुवात केली. त्यामुळे अजित पवार गटालाही आपली राजकीय भूमिका जनतेसमोर ठेवावीच लागली आणि यातून उत्तर सभांचा जन्म झाला.

कोल्हापुरात खडाजंगी

कोल्हापूरमधील शरद पवारांच्या निर्धार सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते. दसरा चौकातील सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवे तर गोळ्या मारा; पण असा छळ नको, असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या कर्त्यांना हे धाडस दाखवता आले नाही आणि ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले, अशा शब्दांत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना नाव न घेता टोला लगावला. या सभेनंतर अजित पवार यांची तपोवन मैदानावर उत्तरदायित्व सभा झाली. त्यापूर्वी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी रोड शो आयोजित केला होता. अजित पवारांच्या सभेसाठी कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार तयारी केली. संपूर्ण शहरात फ्लेक्स आणि बॅनर लावत संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय केले.

येवल्यात संघर्षाला तोंड फुटले

छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात शरद पवारांची राष्ट्रवादीतील फुटीनंतरची पहिली जाहीर सभा झाली. येवला बाजार समितीच्या मैदानावर झालेल्या या सभेत त्यांनी अजित पवार गटाविरुद्ध रणशिंग फुकले. माझा भुजबळांविषयीचा अंदाज चुकला. त्यामुळे मी जनतेची माफी मागतो, असे जाहीर सभेत कबूल केले. या सभेनंतर मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल छगन भुजबळ यांचे येवल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यात त्यांनी शरद पवार साहेब तुम्ही अशाच चुका करा. त्यातून विकास होईल, असा टोला लगावला.

बीडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

बीडमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सभेला त्यांनी स्वाभिमान सभा असे नाव दिले होते. यावेळी धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बबन गीते यांनी मोठ्या लवाजम्यासह शरद पवार गटात प्रवेश केला. बीडच्या भाषणात शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना मोठा इशारा देत खडे बोल सुनावले.

शरद पवारांनी बीडला काय दिले?

अजित पवारांनी बीडमध्ये उत्तरदायित्व सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, प्रेमाच्या पोटी शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिले? ही सभा बीडच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि दुष्काळ कायमचा संपवण्याची आहे. या सभेत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. परंतु, शरद पवार यांच्याविषयी थेट बोलणे टाळले.

Back to top button