

पुणे : साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. तेथील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी विकास पानसरे यांच्या बदलीने रिक्त जागी ही बदली करण्यात आल्याचे आयुक्तालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्याचे साखर आयुक्त पदावर तीन वर्षे पूर्ण कार्यकाळ होण्यापुर्वीच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या प्राधान्याने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यासाठी साखर आयुक्तालय हे महत्वाचे असूनही त्या ठिकाणी शासनालाही एक अधिकारी का नको? असाही प्रश्न साखर वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी साखर आयुक्त पदावर पूर्ण कार्यकाळ काम करण्यास तयार नाहीत काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापुर्वीचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचीही बदली अचानकपणे झाली. तशीच सालिमठ यांचीही बदली एक वर्षे पूर्ण होण्याच्या आतच झालेली आहे. आगामी ऊस गाळप हंगाम 2025--26 च्या तयारीमध्ये साखर आयुक्तालय सध्या व्यस्त आहे. आगामी वर्षात विक्रमी ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकही लवकरच अपेक्षित आहे. त्यानंतर हंगामाचे धोरण निश्चित होणार आहे. तत्पूर्वीच झालेल्या या बदलीने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवाय नवीन साखर आयुक्त कोण येणार की अतिरिक्त पदभार दिला जाणार, हेसुध्दा चित्र बुधवारी स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.