

पुणे: शहरात नव्याने आणखी पाच पोलिस ठाण्यांना अखेर वित्त व गृह विभागाने मंजुरी देताना दोन परिमंडलांनाही मंजुरी दिली आहे. लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, येवलेवाडी, मांजरी या पोलिस ठाण्यांना, तर शहरासाठी परिमंडल (झोन) 6 आणि परिमंडल 7 यांना देखील मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच 830 हून अधिकचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे.
विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, सिंहगड रोड पोलिस ठाण्यातून नऱ्हे पोलिस ठाणे, कोंढवा आणि भारती विद्यापीठातून येवलेवाडी पोलिस ठाणे, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाणे यांना मंजुरी मिळाली आहे. (Latest Pune News)
नुकताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व गृहविभागाला नवीन पोलिस ठाण्यांचा, मनुष्यबळाचा, दोन नवीन झोनचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पुणे शहरातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडताना पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची आवश्यकता का आहे, हे त्यात नमूद करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता ही पाच पोलिस ठाणी शहरात होणार आहेत.
वर्षभरापूर्वी शहरात सात नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली होती. नवीन पोलिस ठाणी, चौक्यांमुळे पोलिस दलाचे कामकाज काही प्रमाणात वेगवान होण्यास मदत होणार आहे. शहराचा विस्तार वाढत आहे, तसेच गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. शहरातील नवीन पोलिस ठाण्यांसह अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त दर्जाच्या सात अधिकाऱ्यांची पदे मंजूर करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मुख्यमंंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यावर आता वित्त व गृह विभागाकडून मंजुरी मिळाल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लवकरच ही पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
पुणे पोलिस दलात सात परिमंडले
पुणे पोलिस दलात सध्या पाच परिमंडले आहेत. पोलिस दलाचे कामकाज गतिमान करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सध्या असलेल्या पाच परिमंडलांचे विभाजन करून सात परिमंडलांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला होता. त्यानुसार परिमंडल सहा आणि परिमंडल सातला आता मंजुरी देण्यात आली आहे.
यापूर्वी शहरात सात पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता आणखी पाच पोलिस ठाण्यांची, झोनची तसेच मनुष्यबळाची गरज प्रस्तावात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार वित्त व गृह विभागाने पाच पोलिस ठाणी, दोन झोन आणि मनुष्यबळाला मंजुरी दिली आहे. पुढील महिनाअखेरपर्यंत ही पोलिस ठाणी सुरू करण्यात येतील.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे