

पुणे: शहरासाठी चालू वर्षांसाठी (2025-26) पाटबंधारे विभाग महापालिकेला किती कोटा मंजूर करणार याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेने सादर केलेल्या पाणी अंदाजपत्रकावर ऑगस्ट अखेरपर्यंत निर्णय होणे अपेक्षित असतानाही अद्याप निर्णय न झाल्याने महापालिकेला पाणी वाटपाचे नियोजन करणे अवघड झाले आहे.
महापालिकेकडून दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठ्याची मागणी केली जाते. त्यावर पाटबंधारे विभाग निर्णय घेते. चालू वर्षासाठी शहराची लोकसंख्या 81 लाख 64 हजार 868 अशी गृहीत धरून त्यासाठी 21.03 टीएमसी पाण्याची मागणी पालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. (Latest Pune News)
त्यातच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा येऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आहे. अद्यापही किती पाणी कोटा मिळणार हे निश्चित नाही, त्यामुळे वर्षभराचे नियोजन करणे अडचणीचे होत आहे.
गत वर्षी महापालिकेने 21.48 टीएमसी पाणी मागीतले होते. पाटबंधारे विभागाने केवळ 14.82 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला होता. यंदा पालिकेने मागणी 0.45 टीएमसीने कमी दाखवली आहे.
त्यातच, नवीन समाविष्ट गावांमधील 16 गावांमध्ये सध्या महापालिका त्यांना पाणी पुरवठा करित नाही. मात्र, नजीकच्या भागातून या गावांना पाणी देण्याचे महापालिकेचे नियोजन सुरू असल्याने त्यासाठीही वाढीव पाण्याची गरज आहे.