Political interference in law enforcement
बापू जाधव
निमोणे: जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेकदा जाहीर संताप व्यक्त केला आहे. माझ्या जवळचा असला, तरी त्याला टायरमध्ये घालून सरळ करा, असेही ते म्हणाले आहेत. पण, छोट्या मोठ्या वादानंतर पोलिसांना थेट याच दादांचे नाव घेऊन धमकावणारेही काही महाभाग आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील अशी दादागिरी रोखायची असेल, तर खाकीला मोकळेपणाने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाकीला बळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Pune News)
बहुतांश गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याचे आजपर्यंत लपून राहिले नाही. आज पोलिसदफ्तरी असलेल्या गुन्हेगारांच्या कुंडल्या गोळा केल्या, तर ते कोणत्या ना कोणत्या राजकीय व्यक्तीशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट होते. या गुंडांमध्ये आपले कसे वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, हे दाखवण्याची स्थानिक पातळीवर स्पर्धा लागल्याचे दिसून येते. त्यामुळे नोकरीत काही अडथळा नको म्हणून अधिकारीही अशा गावगुंडांपासून चारहात लांबच राहतात.
जिल्ह्यातील गुन्हेगारी कायमची हद्दपार करायची असेल, तर चुकीच्या कामासाठी प्रशासनावर दबाव आणणार्या स्थानिक राजकारण्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या कुंडल्या गोळा करायच्या; मात्र त्याच क्षणी त्या गुन्हेगाराची पाठराखण करण्यासाठी खादी आपली पुण्याई कामाला लावत असेल, तर गुन्हेगारी कशी हद्दपार होणार? हा प्रश्न आहे.
खाकीपेक्षा खादी वरचढ आहे, हे दुर्दैवाने गुन्हेगारांच्या मनात दिवसेंदिवस ठसत चालले आहे आणि हे मोडीत काढायचे असेल तर दादा तुम्हीच काहीतरी ठोस भूमिका घ्या, गुन्हेगाराला वाचवायला येणारा खादीतील आका हा कधीतरी पोलिस रेकॉर्डवर आला पाहिजे, यासाठी पोलिसांचे मनोबल वाढण्यासाठी तुम्ही सक्त आदेश देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
गाड्या जाळणारे, संघटित होऊन गावाकडे असो की शहरी भागात दादागिरी करणारे आज कायद्याला वाकुल्या दाखवीत आहेत. मुख्यमंत्री असो की अजितदादा, जाहीर व्यासपीठावर सांगतात की, गुन्हेगार कोणीही असो, त्याला टायरमध्ये घ्या! मग घोडं अडतंय कुठं! याचीही कारणे शोधा.
पोलिस दबावाखाली का म्हणून काम करतात? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नक्की कोण दबाव आणतोय, याचाही शोध घेण्याची गरज आहे. गुन्हेगारीला समाजमान्यता मिळवून देणारे आका खड्यासारखे बाजूला केले नाही, तर लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल. पोलिस प्रशासनातील वाढता हस्तक्षेप हा गुन्हेगारांना बळ देणारा ठरतोय, त्यामुळे गुन्हेगारांची पाठराखण करणार्या खादीतील आकांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर पोलिस डायरीला दैनंदिन नोंदी घेण्याची पद्धत युद्धपातळीवर सुरू करण्याची गरज आहे.
प्रामाणिक अधिकार्यांंना बळ द्या
जो पोलिस अधिकारी राजकारण्यांच्या दबावाखाली गुन्हेगारीकडे कानाडोळा करीत असेल, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. मात्र, जे पोलिस अधिकारी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात, त्यांची बदली करू नये. जनभावना ही आहे की खादीतील आका डोईजड होऊ द्यायचे नसतील तर दादा, खाकीला मोकळीक द्याच!