वालचंदनगर: इंदापूर तालुक्यासह राज्यभरातील लाडक्या बहिणी माझी खरी ताकद आहे. हजारो बहिणींनी मला राखीचा पवित्र धागा बांधला असून, त्यांच्या रक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. तसेच महिलांना कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. 10) झालेल्या रक्षाबंधन सोहळ्यात शेकडो महिलांनी कृषिमंत्री भरणे यांना राख्या बांधल्या, त्या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री भरणे म्हणाले, पद हे केवळ मिरवण्यासाठी नसते, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असते. (Latest Pune News)
माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी नेहमी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे. मिरची, पापड, दुग्धजन्य पदार्थनिर्मिती, बेकरी, अन्नधान्य व कडधान्य प्रक्रिया यांसारख्या उद्योगांसाठी आवश्यक मदत कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाईल. महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि सुरक्षितता, हेच माझे नेहमीचे ध्येय असून, बहिणींचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.’
याशिवाय तालुक्यातील शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व शेतकर्यांना पाणी उपलब्ध करून देणे, पीकविमा योजनांबाबत प्रोत्साहन देणे तसेच रासायनिक खतांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याबाबतही कृषिमंत्री भरणे यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी कृषिमंत्री भरणे यांच्या महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन क्षेत्रातील कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या मदतीमुळे आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाल्याचेही अनेक बहिणींनी सांगितले.