माणिक पवार
नसरापूर: डोंगराळ निसर्गाच्या कुशीत वसलेले नसरापूर (ता. भोर) येथील पांडवकालीन श्रीक्षेत्र बनेश्वर हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान, तर पर्यटकांसाठी निसर्गरम्य सहलस्थान बनले आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून येणारे भाविक येथे दर्शन घेतात आणि आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतात. शिवमंदिराभोवती असलेल्या केतकी, जांभूळ, करंज यांसारख्या वृक्षांच्या दाट वनश्रीमुळे यास ‘बनेश्वर’ नाव लाभले आहे.
बनेश्वर हे पुणे शहरापासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. पुणे-सातारा महामार्गावरून नसरापूर गावापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. नसरापूराच्या उत्तरेला दीड किलोमीटर, शिवगंगा ओढ्याच्या काठी, दाट जंगलात हे मंदिर आहे. इतिहासानुसार नानासाहेब पेशव्यांनी इ.स. 1739 ते 1749 या कालावधीत हे मंदिर बांधले. त्यासाठी 19,426 रुपये 6 आणे खर्च करण्यात आल्याची नोंद आहे. (Latest Pune News)
मंदिराचे आवार बाजूंनी बंदिस्त असून, आग्नेय बाजूस प्रवेशद्वार आहे. प्रवेशानंतर उजवीकडे दोन जलकुंडे असून, उत्तरेकडील कुंडाजवळ नंदीमंडप आहे. या नंदीमंडपासमोरच पूर्वाभिमुख मुख्य मंदिर आहे.
मंदिरात सोपा, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग आहेत. सभामंडपात एकही खांब नाही, तो चार भिंतींवर आधारलेला असून, घुमटाने आच्छादलेला आहे. गर्भगृहात उत्तराभिमुख शिवलिंग असून, खाली पोकळीत एका गोल शिलाखांबावर कोरलेली पाच शिवलिंगे सतत वाहणार्या पाण्यात न्हाऊन निघतात.
मंदिरात चार जलकुंडांपैकी सध्या तीन आहेत. तीर्थकुंड, स्नानकुंड आणि इतर वापरासाठीचे कुंड. या कुंडांतील पाणी कधीच आटत नाही. आवारात दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गणेश मंदिर, यज्ञकुंड आणि कलात्मक तोरण आहे. गर्भगृहाचा बाह्यांग तारकाकृती असून, चौथर्याभोवती चक्रव्यूहाकार पाण्याची रचना आहे. जलकुंडांतले रंगबिरंगी मासे भाविकांचे आकर्षण आहेत. मंदिराच्या सोप्यात तीन खण असून, त्यावर चौकोनी शिखर आहे.
मधल्या खणाच्या छताला लटकलेली मोठी काशाची घंटा ही वसई मोहिमेतील विजयचिन्ह आहे. थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पांनी इ.स. 1737-1739 या कालावधीत पोर्तुगिजांचा पराभव करून अशा घंटा विविध मंदिरांना अर्पण केल्या. या घंटेवर इ.स. 1683 व क्रॉसचे चिन्ह कोरलेले आहे. ब्रिटिशकाळात मंदिराची देखभाल भोर संस्थानामार्फत होत होती. सध्या स्थानिकांकडून स्थापन करण्यात आलेल्या ’बनेश्वर देवस्थान ट्रस्ट’मार्फत मंदिराचे कामकाज चालते.