सासवड: पुणे-पंढरपूर महामार्गावरील वीर फाटा ते बोरवके मळ्यापर्यंतच्या माऊली विसावा पर्यंत भूसंपादन रखडले आहे. हा एक किलोमीटर लांबीचा रस्ता सन 2013 पासून सुमारे 16 वर्षापासून प्रशासनाच्या ऊदासीनतेमुळे रखडला आहे.
याबाबत बाधित शेतकर्यांच्या वतीने मंत्री जयकुमार गोरेंना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तुमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे, असे आश्वासन गोरे यांनी बाधित शेतकर्यांना दिले. (Latest Pune News)
यावेळी बाधित शेतकरी दामोदर रामभाऊ जगताप, भास्कर सुभानराव जगताप, ज्ञानेश्वर संताजी जगताप, उदयराज जयवंत जगताप, प्रमोद मधुकर बोरावके, सूर्यकांत रामचंद्र गिरमे, शत्रुघ्न पंढरीनाथ जगताप, अनिल मारुती गिरमे, अरुण सुभानराव जगताप, राजेंद्र दत्तात्रय बोरावके, कुमार मारुती जगताप, संतोष सुधाकर गिरमे, प्रदीप काशिनाथ राऊत, बाळासाहेब गेनबा बोरवके आदी उपस्थित होते.
आळंदी ते पंढरपूर 965 क्रमांकाच्या पालखी महामार्गाचे काम पुर्णत्वास जात असताना सासवड हद्दीतील या एक किलोमीटरचा रस्ता शासनाच्या उदासीनतेमुळे होवू शकला नाही. या मार्गाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जात असतो. सन 2013 मध्ये चौपदरी रस्ता बांधकामचे काम मंजूर होते. रस्त्याचे भूसंपादन झाले परंतु लागणारा निधी उपलब्ध न झाल्याने तसेच स्थानिक शेतकर्यांच्या विरोधामुळे काम पूर्ण झाले नाही.
मागण्यांची पूर्तता करावी
2013 पासून रखडलेला भूसंपादनचा प्रश्न मार्गी लावून 150 बाधित शेतकर्यांना योग्य तो मोबदला द्यावा. आमच्या मागण्याची पूर्तता न झाल्यास या रोडच्या कामाला आम्ही हात लावून देणार नाही. आमच्याकडे न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे बाधित शेतकरी सचिन राऊत यांनी सांगितले.