

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा पहिलाच पेपर एकदम टकाटक गेला. वर्षभर केलेला अभ्यास, सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कृतीपत्रिकेची काठिण्य पातळी कमी असल्यामुळे पेपर संपल्यानंतर विद्यार्थी एकदम हसरे चेहरे घेऊनच वर्गाबाहेर आले. मराठीचा पेपर सोपा होता. त्यामुळे आता इंग्रजी विषयाची तयारी करायची असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.
परीक्षेदरम्यान कॉपी आणि तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थी वेळेत पोहोचले. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची कसून तपासणी केल्यानंतर प्रवेश देण्यात आला. सोबत आणलेली बॅग, चप्पल, बूट इतर साहित्य प्रवेशद्वारावर जमा करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांचीही परीक्षा केंद्रावर गर्दी होती. पहिला पेपर असल्याने मुलाला सोडायला अनेकजण कुटुंबासह आले होते.
सकाळच्या सत्रात प्रथम भाषा मराठीसह हिंदी, उर्दू, तर दुपारच्या सत्रात फ्रेंच भाषेचा पेपर होता. पहिला पेपर मराठीचा असल्याने अनेकांच्या चेहर्यावर काहीसे दडपण असल्याचे चित्र होते. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर सोप्या कृतीमुळे पेपर सोडविणे अधिक सहज झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक नसल्याचेदेखील विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. पहिला पेपर सोपा गेल्याने विद्यार्थी, विद्यार्थिंनी हस्तांदोलन करत आनंदी चेहर्याने परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना दिसले. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पेपर सोपा होता. पेपर सोपा असल्यामुळे भाषा विषयाला राज्यात केवळ 8 गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले.
बारावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव झालेला असतो. त्यामुळे पालकदेखील बिनधास्त असतात. मात्र, दहावीच्या परीक्षेला पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यास येतात. पेपर होईपर्यंत परीक्षा केंद्रावरच बसून राहतात. विद्यार्थीवर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहर्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येते.
विद्यार्थी म्हणतात…
दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी टाईम मॅनेजमेंट केले. त्यानुसार प्रत्येक विषयाचा युनीटनुसार अभ्यास केला. मराठीचा पेपर 80 गुणांचा होता. त्याचे तीन भाग केले. यामध्ये 30 गुणांचे दोन, तर 20 गुणांचा एक भाग असे नियोजन होते. विषयाची चांगली तयारी झाल्याने पेपर सोपा गेला.
– नीलराज जगताप, विद्यार्थी, न्यु इंग्लिश स्कूल.
पहिलाच पेपर असल्यामुळे धाकधुक होती. परंतु शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिकेवर बारकोड कसा लावायचा, तो योग्य लावला आहे का याची पाहणी केली. पहिलाच पेपर असतानादेखील शाळेत भरारी पथकाने भेट दिली. त्यामुळे कॉपीसारखे प्रकार करण्यास कोणीही धजावले नाही.
– विकास राठोड, विद्यार्थी, न्यु इंग्लिश स्कूल.
पेपर खूपच चांगला होता. चांगल्याप्रकारे लिहिता आला. कोणताही ताण न घेता पेपर लिहिला. आता टेन्शन इंग्रजीच्या पेपरचे आहे. परंतु पुरेसा वेळ असल्याने आता संबंधित विषयाची चांगली तयारी करता येणार आहे.
– श्रध्दा होगे, विद्यार्थिनी, न्यु इंग्लिश स्कूल.
मराठीचा पेपर खूपच सोपा होता. पेपर चांगला असल्यामुळे लिहिण्यासदेखील वेळ पुरला. आता गुरुवारी होणार्या इंग्रजी पेपरची तयारी करायची आहे. वेळ भरपूर असल्याने चांगली तयारी होईल.
– आयुष कोटकर, विद्यार्थी, न्यु इंग्लिश स्कूल.
हेही वाचा