

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि राजगड खोर्यात वसलेल्या राजगड (वेल्हे) तालुक्यातील दुर्गम गुंजवणी गावातील एसटी बससेवा गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असल्याने स्थानिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरोनाकाळात बंद झालेली ही बससेवा अद्यापही सुरू न झाल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी पायपीट करावी लागत आहे.
‘गाव तेथे बस सेवा’ हे एसटीचे ब्रीदवाक्य असतानाही, गुंजवणी गाव अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक सुविधेपासून वंचित आहे. यामुळे येथील नागरिकांना बससाठी दुसर्या गावांमध्ये जावे लागते. परिणामी, त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने या गावातील बंद केलेली बससेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (Latest Pune News)
...म्हणून ही सेवा बंद: एसटी प्रशासन
पुणे-गुंजवणी मार्गावर बस सुरू ठेवण्यासाठी दैनंदिन खर्च सुमारे आठ हजार रुपये येतो. तर उत्पन्न मात्र केवळ एक हजार ते बाराशे रुपये इतकेच मिळते. यात डिझेलचा खर्च चार ते पाच हजार रुपये आणि खेडशिवापूर टोलनाक्याचा खर्च 300 ते 400 रुपये आहे. याशिवाय चालक आणि वाहकांच्या पगाराचा खर्चही आहे. त्यामुळे ही सेवा बंद केल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
...अन्यथा, पीएमपीची सेवा वाढवा
दरम्यान, एसटीला परवडत नसेल तरी, पुणे- वेल्हे मार्गावर पीएमपीएमएलची सेवा सुरू आहे. त्यामुळे हीच सेवा गुंजवणीपर्यंतवाढवा अशी मागणीही ग्रामस्थांकडून होेत आहे.
गुंजवणी गावात आमची एसटी सेवा सुरू होती. परंतु, कोरोनानंतर ती बंद करण्यात आली. या भागात प्रवाशांचा प्रतिसाद खूपच कमी असल्याने उत्पन्नही अत्यल्प मिळते. तर खर्च त्यापेक्षाही कितीतरी पटीने खूप जास्त आहे. त्यामुळे मी पुण्यात येऊन पदभार घेण्यापूर्वीच ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग
गावकरी म्हणतात... पूर्वी येथे एसटी मुक्कामी असायची, त्यामुळे आमच्या गावातील लोकांना ये- जा करणे सोपे झाले होते. परंतु, आता ही सेवा बंद झाल्यामुळे आम्हाला अनेक किलोमीटर चालत दुसर्या गावात जावे लागते. एसटी प्रशासनाने तातडीने ही सेवा पूर्ववत करावी.
- गुलाब रसाळ, सरपंच, गुंजवणी गाव