दौंड : प्रवाशाच्या मारहाणीत एसटीचा वाहक जखमी
दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती-दौंड प्रवासादरम्यान बसचा वाहक व प्रवासी यांच्यात हाणामारी झाली. यात प्रवाशाने वाहकाचे तोंड फोडले. दत्ता शांताराम कुटे (वय 37, रा. बीड, सध्या पैठण एसटी डेपो) असे त्याचे नाव आहे. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीहून हारूण इक्बाल कुरेशी (वय 32, रा. बारामती) हा प्रवासी बारामती-दौंड गाडीने प्रवास करीत होता.
परंतु, ही गाडी रस्त्यात पंक्चर झाल्याने त्यातील प्रवासी सातारा-पैठण (एमएच 20 बीएल 2841) या गाडीमध्ये बसविण्यात आले. या गाडीत प्रवाशाने दौंडचे तिकीट आहे, असे सांगितले. ही बस दौंड येथील गोल्ड राउंडजवळ आल्यावर वाहकाने कुरेशीला उतरण्यास सांगितले. परंतु, त्याने नगर मोरी येथे उतरायचे आहे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.
कुरेशी याने त्याच्याजवळील चाकूने वाहकावर वार करण्याचा प्रयत्न केला. वाहकाने वार चुकविला. परंतु, कुरेशीच्या मारहाणीत वाहक कुटे जखमी झाले. त्यानंतर कुरेशी पळून जाऊ लागला. त्याला प्रवासी व इतर नागरिकांनी पकडले. वाहकाने सदर बस दौंड पोलिस ठाण्यात आणली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा

