

महेंद्र कांबळे
पुणे : पुण्याचा यावर्षीचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि हायटेक सुरक्षेत पार पडणार आहे. लाखो भाविकांच्या गर्दीत शिस्त व शांती राखण्यासाठी पोलिसांकडून हजारोंचा बंदोबस्त उभारला जाणार असून, त्यांच्या मदतीला आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कॅमेरे, आयपी स्पिकर्स आणि ड्रोन गस्त ही तिहेरी सुरक्षा यंत्रणा कार्यरत राहणार आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर वचक बसेल तर नागरिकांचा उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल. (Pune Latest News)
शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग, मंडळांचे मंडप, रेल्वे स्थानक, एसटी स्टँड व गर्दीच्या ठिकाणी 2 हजार 886 हाय डेफिनेशन एआय कॅमेरे बसविण्यात आले असून, यापूर्वीचे 1 हजार 341 कॅमेरे अपग्रेड केले आहेत. हे कॅमेरे नाईट व्हिजनसह असून त्यामध्ये फेस रेकग्नायझेशन सिस्टीम, अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्सचा वापर होणार आहे. पोलिसांकडील गुन्हेगारांच्या डेटाबेसशी थेट लिंक झाल्यामुळे पेहराव बदलल्या नंतरही आरोपींना तातडीने ओळखणे शक्य होणार आहे.
शहरभर 200 आयपी स्पिकर्स बसविण्यात आले आहेत. अचानक झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवणे, तातडीची सूचना देणे किंवा वाहतुकीचे मार्गदर्शन करणे यासाठी हे स्पिकर्स उपयोगी ठरणार आहेत.
सुरक्षेतील महत्त्वाचे म्हणजे ड्रोन गस्त असून शहरातील मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या भागांवर ड्रोनच्या नजरेतून लक्ष ठेवले जाणार आहे. वरून घेतलेले हे दृश्य पोलिस नियंत्रण कक्षाला थेट मिळणार असून, गर्दीत संशयास्पद हालचाली ओळखणे आणखी सोपे होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा व सर्व झोनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाण्याचे प्रभारी, त्याचे अधिकारी अंमलदार ही गणेशोत्सवातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करतील.
गुन्हेगारांवर वचक : फेस रेकग्नायझेशनमुळे पेहराव बदलूनही सराईत आरोपी ओळखले जातील.
ड्रोन गस्त : गर्दीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवल्यामुळे संशयित हालचाली हेरता येतील.
तातडीचे अलर्ट : कॅमेर्यात आरोपी आढळताच नियंत्रण कक्षाला सूचना मिळेल.
आयपी स्पिकर्सची मदत : गर्दीत शिस्त राखण्यासाठी आणि इशारे देण्यासाठी तातडीचे संदेश देता येतील.
नाईट व्हिजन सुरक्षा : रात्रीच्या कार्यक्रमांतही गुन्हेगारांची हालचाल पकडणे शक्य होईल. मोठ्या सुरक्षेमुळे संशयास्पद हालचालीवर लक्ष राहील.