

पुणे : गर्भावस्थेतील उच्च रक्तदाबामुळे केवळ 24 वर्षांच्या तरुणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. खासगी रुग्णालयांनी किडनी प्रत्यारोपणासाठी तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला. एवढा पैसा कसा उभा करायचा, याबाबत कुटुंबासमोर मोठे संकट उभे होते. अखेर आईने स्वत:ची किडनी दान करून लेकीला पुनर्जन्म दिला. ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. (Pune Latest News)
कर्नाटकातील विजयापूरमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणार्या आईने 2021 मध्ये मुलीचा विवाह पुण्यातील वाहनचालकाशी करून दिला. दुसर्या वर्षी तिला मुलगी झाली. मात्र, गर्भावस्थेत आलेल्या उच्च रक्तदाबामुळे तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. खासगी रुग्णालयांनी कोट्यवधीचा खर्च सांगितल्याने आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबाने प्रत्यारोपणाचा विचारच सोडून डायलिसिसवरच समाधान मानले. वर्षभर आठवड्यातून तीनवेळा रक्तशुद्धीची ही प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, तरुणीच्या पतीला ओळखीच्या व्यक्तीकडून ससून रुग्णालयामध्ये अल्प खर्चात प्रत्यारोपण होऊ शकत असल्याची माहिती मिळाली. ससूनमध्ये दाखल झाल्यावर सर्व तपासण्या पूर्ण करून सात ऑगस्ट रोजी आई- मुलीचे प्रत्यारोपण पार पडले. सध्या दोघींची प्रकृती स्थिर असून कुटुंबीयांनी ससूनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लता भोईर यांच्यासह डॉ. पद्मसेन रणबागळे, डॉ. सुरेश पाटणकर, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. संजय मुंडे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षीरसागर, सिस्टर राजश्री कानडे, मुख्य अधिसेविका विमल केदारी आदींचा सक्रिय सहभाग होता.
ससूनमध्ये आतापर्यंत 34 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या आहेत. येथे शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, औषधे, तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध होतात.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
प्रत्यारोपणासाठी रुग्णांना पंतप्रधान निधीतून 2.5 लाखांची मदत मिळते. महात्मा फुले जनआरोग्य योजना, विविध संस्थांच्या मदतीने गरीब रुग्णांची शस्त्रक्रिया लाखभर रुपयांत होते.
- सत्यवान सुरवसे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक, ससून रुग्णालय