

उडान योजनेतून पुण्यातून सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनगड, भावनगरला नवीन हवाई जोडणी
देशांतर्गत प्रवासाला मिळाला दिलासा
पुणे : पुणे विमानतळावरून आर्थिक वर्षात पाच नव्या देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्या आहेत. उडान योजनेतून सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनगड आणि भावनगरला पुणे शहरासोबत नवीन हवाई जोडणी मिळाली आहे. या पाचही विमानसेवा पंतप्रधानांची संकल्पना असलेल्या उडान योजनेअंतर्गत सुरू झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pune Latest News)
अलीकडील आर्थिक वर्षात म्हणजेच सन 2024-25 मध्ये या नवीन विमानसेवा पुणे विमानतळ प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने नुकताच पुण्यात सुरू असलेल्या उडान योजनेची माहिती घेतली. या योजनेअंतर्गत पुण्यातून देशातील पाच शहरांमध्ये नव्याने विमानसेवा सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
‘उडान’ म्हणजे ‘उडे देश का आम नागरिक’ ही एक प्रादेशिक विमानतळ विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना आहे. या योजनेचा उद्देश परवडणार्या दरात देशातील सामान्य नागरिकांना हवाई प्रवास उपलब्ध करून देणे, छोट्या शहरांना विमानसेवेशी जोडणे आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीला चालना देणे, हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाईक्षेत्राचा विकास होण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात विमान प्रवास करता यावा, यासह राज्यातील विमानाचे जाळे वाढावे, याकरिता उडान योजना 21 ऑक्टोबर 2016 साली सुरू केली. यामुळे राज्यासह देशातील विविध ठिकाणी विमानसेवेचे जाळे आणखी पसरले तसेच विमान प्रवाशांनाही परवडणार्या दरात प्रवास करता येऊ लागला आहे. परिणामी, आपोआपच हवाई क्षेत्राचा आता विकास होत आहे.
‘उडान’ योजनेमुळे छोट्या शहरांनाही विमान कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनगड आणि भावनगरसारख्या शहरातून थेट मोठ्या शहरात प्रवास करणे हे शक्य झाले. यामुळे आता प्रवासाचा वेळ वाचला आहे. त्यातच उडान योजनेमुळे खर्चही कमी झाला आहे. यामुळे सर्व सामान्य माणसालाही हवाईप्रवासाचा आनंद घेता येत आहे. ही योजना खरोखरच कौतुकास्पद आहे.
- आनंद सप्तर्षी, विमानप्रवासी