Jejuri Bus Accident: बारामतीहून जेजुरीकडे येणार्या एसटी बसचालकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यातील दोघे अत्यवस्थ आहेत. गुरुवारी (दि. 24) सायंकाळी सहाच्या दरम्यान मावडी येथे मोरगाव-जेजुरी रस्त्यावर हा अपघात घडला.
या अपघातात लक्ष्मण शेतीबा पवार, मालन लक्ष्मण जगताप, वत्सलाबाई गोरखकर (रा. भोर), कौशल्या गोविंद नाझीरकर, गोविंद दगडू नाझीरकर (रा. नाझरे), विलास महादेव कुदळे, सविता बाळू खोमणे (रा. जेजुरी), बाळासाहेब पांडुरंग दवणे (रा. दवणेवाडी), नीलम नवनाथ चव्हाण (रा. सासवड), चालक नंदकुमार नामदेव जगताप (रा. बारामती) हे जखमी झाले आहेत. यातील चालक जगताप आणि कौशल्या नाझीरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातग्रस्त बस गुरुवारी सायंकाळी बारामतीहून जेजुरीकडे येत होती. त्या वेळी अचानक एसटी चालकाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्यावरून खाली गेल्याने हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच भोर विभागाचे पोलीस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक नामदेव तारडे, पोलिस हवालदार संदीप भापकर, विठ्ठल कदम, रेणुका पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.