

मुंबई : पुढारी ऑनलाईन
जागावाटपासाठी आम्ही कधी दिल्लीत गेलो नाही. उद्धव ठाकरे हे देखील जागावाटपासाठी कधी दिल्लीला गेले नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी दिल्लीत जावे लागते. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख हे अमित शहा आहेत अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, यापूर्वी दिल्लीचे नेते मातोश्रीवर यायचे मात्र आता या शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीला जावे लागते हे दुर्देवी आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना राऊत यांनी दिल्लीच्या प्रदूषित हवेत एकनाथ शिंदे असल्याने त्यांची विचारशक्ती प्रदूषित झाली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना त्यांनी मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कोणत्याही जागेवरून पेच नसल्याचे स्पष्ट केले. एका मतदारसंघात अनेक इच्छुक असु शकतात. वाद्र्यातून वरूण देसाईंचा विजय निश्चीत असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.