

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगीरित्या 17 नंबर अर्ज भरून दहावी आणि बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना आता 16 ते 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत 15 सप्टेंबर रोजी संपुष्टात येण्यापूर्वीच शिक्षण मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
17 नंबरचा अर्ज भरून विद्यार्थ्यांना थेट दहावी किंवा बारावीची परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Latest Pune News)
दहावी आणि बारावीसाठी नोंदणी शुल्क 1 हजार 110 रुपये, प्रक्रिया शुल्क 100 रुपये तसेच विलंब शुल्क 100 रुपये आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबर आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http:/// www. mahahsscboard. in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यापूर्वी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा द्यायची आहे. त्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे.
आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे ज्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही तसेच ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी- बारावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून 17 नंबर अर्ज भरून नावनोंदणी करता येते. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी प्राप्त झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.