

पुणे: महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 कमला नेहरू हॉस्पिटल- रास्ता पेठ या प्रभागाचे अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण जाणीवपूर्वक उठविण्यात आल्याचा संभम निर्माण केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचा अप्रचार केला जात असल्याचा आरोप रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे.
प्रभाग रचना आणि त्यामधील आरक्षण यावर होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर देताना डंबाळे यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करणे प्रत्येक शासकीय यंत्रणेसाठी बंधनकारक आहे. (Latest Pune News)
त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठीदेखील पुणे शहरात प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, महाविकास आघाडीचा काही नेत्यांकडून पुण्यातील दलित समाजामध्ये संभम निर्माण करून जातीय तेढ वाढवण्याचे काम होत आहे.
बीडकर यांना बदनाम करण्यासाठी ‘मविआ’कडून अपप्रचार
प्रभाग क्रमांक 24 कमला नेहरू हॉस्पिटल रस्ता पेठ संदर्भात हेतुपुरस्सर माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांना बदनाम करण्यासाठी लक्ष्य केले जात आहे. 2017 च्या अपवाद वगळता, गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात रास्ता पेठ-सोमवार पेठ या प्रभागात एससी आरक्षण लागू झालेले नाही.
या भागात समाविष्ट असणारी अनुसूचित समाजाची लोकवस्ती दुसऱ्या प्रभागात गेल्याने हे आरक्षण आता संबंधित प्रभागात कायम आहे. तरीही तथ्यांचा आधार न घेता बीडकर यांच्यावर आरोप करणे हा जाणूनबुजून केलेला खोटारडेपणा आहे. अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणाला अनुसूचित जाती समाज आणि आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल व कधीही थारा देणार नाही, असेही डंबाळे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात!
निवडणूक प्रकियेवर निर्माण केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे आगामी महापालिका निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी डंबाळे यांनी केली आहे.