Pune Politics: विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले महापालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची भेट घेऊन नाराजी दूर करू, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पर्वती मतदारसंघातून भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. तसेच कोथरूडमधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. (Latest Political News)
मात्र, भाजपने कोथरूडमधून मंत्री व विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांनी कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेतले. या वेळी पत्रकारांनी बालवडकर यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, काहीही करून विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे.
एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे भिमाले व बालवडकर यांची भेट घेऊन त्यांना समजावणार आहे. त्यांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती करणार आहे.लोकसभा निवडणुकीत सोबत असलेली मनसे विधानसभा स्वबळावर लढणार आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराचे आव्हान वाटते का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, मनसेच्या उमेदवाराचा विचार करून योग्य डावपेच आखले जातील, असेही पाटील म्हणाले.