Maharashtra Assembly Polls : भाजपच्या पहिल्याच यादीत नगर जिल्ह्यातील पंचरत्न !

कोपरगाव, अकोले, नगर शहर, पारनेर राष्ट्रवादीकडे आणि श्रीरामपूर, नेवासा शिवसेनेला?
Maharashtra Assembly Polls
भाजपFile Photo
Published on
Updated on

जिल्ह्यातील बारा मतदारसंघांपैकी भाजपने पहिल्याच यादीत पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत महायुतीमध्ये बाजी मारली आहे. महायुतीचे जागावाटप समोर आले नसतानाच जाहीर उमेदवार यादीतून भाजपच मोठा भाऊ असल्याचे आता समोर आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अकोले, कोपरगाव, नगर शहर आणि पारनेर आणि शिंदे सेनेला नेवासा, श्रीरामपूर हे मतदारसंघ मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. संगमनेरमधून भाजप की शिंदेंची शिवसेना हे अद्याप ठरले नसल्याचे समजते. तेथून आ. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील लढण्याची तयारी करत आहेत. महायुतीत संगमनेरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेली, तर डॉ. सुजय विखे पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

प्रतिभा पाचपुतेंच्या उमेदवारीने अनुराधा नागवडे यांना ‘ब्रेक’

भाजपच्या पहिल्याच यादीत श्रीगोंद्यातून डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर होताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत मुंबईच्या वाटेने निघालेल्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या महायुतीतील राजकीय वाटचालीस ‘ब्रेक’ लागला आहे. आता त्या महाविकास आघाडीच्या संपर्कात असून प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

1980 पासून विधानसभेच्या मैदानात असलेले बबनराव पाचपुते यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे प्रथमच बाहेर राहावे लागले असून त्यांच्याऐवजी भाजपने त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. प्रतिभा पाचपुते या माजी जिल्हा परिषद सदस्य असून आ. पाचपुते यांच्या बरोबरीने त्या राजकारणात सक्रिय आहेत. थेट जनसंपर्क असणार्‍या डॉ. प्रतिभा यांच्या उमेदवारीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणार्‍या अनुराधा नागवडे यांचा भ्रमनिरास झाला आहे. 2009 मध्ये राजेंद्र नागवडे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. पुढे ते काँग्रेसमध्ये परतले. 2019 ला ते पुन्हा भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर बबनराव पाचपुते यांचा प्रचार करण्याची वेळ आली. त्यानंतर मविआची सत्ता येताच ते काँग्रेसमध्ये परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद सोडून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. या पक्षाकडून अनुराधा नागवडे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होत्या. मात्र ही जागा भाजपला असल्याने प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू केली आहे. मविआकडून उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी त्या अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

अनुराधा नागवडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष असून जिल्हा बँकेच्या संचालक आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्या विधानसभेची तयारी करत असून प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीने त्यांच्या महायुतीतील राजकीय वाटचालीस ब्रेक लागला आहे.

राजळेंसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे नाव जाहीर झाले आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुण मुंढे, गोकुळ दौंड हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपने तिसर्‍यांदा मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्याचे आव्हान राजळे यांच्यासमोर असेल. दरम्यान, राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, बंडू पठाडे, रवींद्र वायकर, धनंजय बडे, काका शिंदे, बंडू बोरुडे, शुभम गाडे, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, प्रसाद आव्हाड, महेश बोरुडे, अजय भंडारी, डॉ.रमेश हंडाळ, नामदेव लबडे, जे. बी. वांढेकर, बापूसाहेब गर्जे, सचिन वायकर, राजू सुरवसे, जमीर आतार, संदीप पवार, अशोक मंत्री, डॉ. जगदीश मुने, नवनाथ नरोटे, मंगल कोकाटे, दुर्गा भगत, सिंधु साठे, स्मिता लाड, ज्योती शर्मा यांनी आनंदोत्सव साजरा केला.

राधाकृष्ण विखे यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणेच

भाजपच्या पहिल्याच यादीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी अपेक्षेप्रमाणेच आहे. सलग सात वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे पाठबळ आणि विकासप्रक्रियेला दिलेली साथ महत्त्वपूर्ण असून भविष्यातही हा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास दाखवून पुन्हा संधी दिल्याबद्दल विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

गेल्या पाच वर्षांत ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहिलो. महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी विश्वासाने विकास प्रक्रियेला साथ देऊन दिलेल्या पाठबळामुळे काम करण्याचा आत्मविश्वास अधिकच वाढल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

राहुरीतून पुन्हा कर्डिले; पण आव्हानांचा डोंगर

उमेदवारीच्या स्पर्धेत बाजी मारत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना भाजपने पहिल्याच यादीत स्थान दिले आहे. मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जनसंपर्कात कमी पडलेल्या कर्डिलेपासून दूर जात रावसाहेब चाचा तनपुरे यांनी ‘काँग्रेसचा हात’ जवळ केला आहे. भाजपचे युवक अध्यक्ष धीरज पानसंबळ यांनीही ‘तुतारी’ वाजविल्याने कर्डिले यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळवीचे मोठे आव्हान आहे.

‘प्रवरे’च्या यंत्रणेवर विसंबून असलेले कर्डिले मात्र राहुरीत अपेक्षित नेतृत्व तयार करू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते कर्डिलेपासून दुरावत तनपुरेंच्या नेतृत्वात कार्यरत असल्याने त्यांना पुन्हा माघारी आणण्याचे आव्हान कर्डिलेंसमोर असेल.

मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती व सेवा सोसायट्यांवर आ. तनपुरे यांचे वर्चस्व असल्याने ते मोडीत काढण्याची कसरत शिवाजी कर्डिले यांना करावी लागणार आहे. शिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना डॉ. तनपुरे साखर कारखान्याची स्थिती हा मुद्दाही या निवडणुकीत प्रचाराच्या स्थानी असण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याचे आव्हानही कर्डिले यांच्यासमोर असेल. एकंदरीत भाजपने शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी संघटना मजबुतीसोबतच बेरजेचे गणित ते कसे सोडविणार? यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल, असे मानले जाते.

कर्जत-जामखेडमधून राम शिंदे

कर्जत-जामखेड मतदारसंघातून आ. राम शिंदे यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या वेळी रोहित पवारांकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची जिद्द आ. शिंदे यांच्या मनात कायम आहे. भाजपने विधान परिषदेवर त्यांचे पुर्नवसन केले; मात्र तरीही ते पवार यांच्या विरोधात सज्ज झाले आहेत. विकास आणि एमआयडीसी हे महत्त्वाचे मुद्दे प्रचारात महत्त्वाचे असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news