रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात पेरण्यांचे नियोजन

रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात पेरण्यांचे नियोजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हजार हेक्टर इतके आहे. तर यंदाच्या 2023-24 च्या हंगामात 2 लाख 41 हजार हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बहुतांशी तालुक्यांमध्ये पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण आहे. तर सुमारे 30 हजार 362 क्विंटलइतक्या बियाणांची उपलब्धता असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील प्रमुख पीक ज्वारी असून, या पिकाखाली सर्वाधिक 1 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र येते. त्या खालोखाल गव्हाचे 45 हजार हेक्टर, हरभरा 35 हजार हेक्टर, मका 25 हजार हेक्टरइतके क्षेत्र असून, अन्य कडधान्यांचे तीन हजार हेक्टरइतके क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) मिळून 11 हजार 500 क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून 18 हजार 862 क्विंटलइतक्या बियाणांच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असून, गरजेपेक्षा बियाणांची अधिक उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रब्बी हंगामात पिकांखालील बारामती तालुक्यात 38 हजार 504 हेक्टरइतके सर्वाधिक क्षेत्र आहे. त्या खालोखाल पुरंदर 25 हजार 479 हेक्टर, इंदापूर 21 हजार 320 हेक्टर, शिरूर 19 हजार 747 हेक्टर, खेड 16 हजार 677 हेक्टर, जुन्नर 14 हजार 155 हेक्टर, आंबेगाव 13 हजार 692 हेक्टर, दौंड 11 हजार 491 हेक्टरइतके क्षेत्र आहे. तर खरिपातील भात पट्ट्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांत तुलनेने रब्बी हंगामातील पिकांखालील क्षेत्र कमी असल्याचेही काचोळे यांनी सांगितले.

बियाण्यांची 30 हजार 362 क्विंटलची उपलब्धता
बियाण्यांचा प्रत्यक्ष वापराचा आढावा घेतला असता जिल्ह्यात हंगाम 2020-21 मध्ये 26 हजार 118 क्विंटल, 2021-22 मध्ये 32 हजार 720 क्विंटल आणि 2022-23 मध्ये 29 हजार 138 क्विंटलइतक्या बियाण्यांचा वापर झाला होता. तर मागील तीन वर्षांची सरासरी पाहता 29 हजार 325 क्विंटल बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झालेली होती. याचा विचार करता यंदाच्या वर्षी 30 हजार 362 क्विंटलइतक्या बियाण्यांच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news