..तर मुंबई गाठावी लागेल : सुप्रिया सुळेंबाबत अजित पवारांच विधान चर्चेत

 ..तर मुंबई गाठावी लागेल : सुप्रिया सुळेंबाबत अजित पवारांच विधान चर्चेत
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासाचे 'व्हिजन' आहे. दुर्दैवाने गेली दहा वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्राचा निधी आला नाही. त्यामुळे विकासाचा वेग गतिमान करण्यासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. महायुतीच्या उमेदवाराला मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली, मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मात्र टीका करणे त्यांनी टाळले.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेत अजित पवार बोलत होते. सभेला चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, आ. अमोल मिटकरी, सुरेखा ठाकरे, ईश्वर बाळबुधे, रूपाली चाकणकर, रूपाली ठोंबरे, कमल ढोले, राजलक्ष्मी भोसले, सुनील पोटे, सुरेंद्र जेवरे, सुधीर पाटसकर, सतीश काकडे, शहाजी काकडे, विश्वास देवकाते, राजवर्धन पाटील, सुधीर पाटसकर, पी. के. जगताप, संभाजी होळकर, जय पाटील, किरण गुजर, सचिन सातव, सचिन खरात, सुनील शिंदे, दिलीप धायगुडे आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, 'पुढील दोन दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या काळात कोणतीही चूक घडू देऊ नका. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणानुसार वाटचाल करा. बारामतीकरांपुढे आता वेगळा प्रसंग ओढवला आहे, परंतु भावनिक होऊ नका. विकास कोणी केला, हे पाहा. आजवरचा विकास हा राज्याच्या निधीवर झाला. खासदारांनी केंद्राचा निधी आणलाच नाही. तो आणत विकासाचा वेग

वाढवण्यासाठी महायुतीला साथ द्या.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात मुक्कामी असताना त्यांच्यासोबत मतदारसंघातील पाणी प्रश्न, मेट्रो, रेल्वे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कृष्णा-भीमा स्थिरीकरण या मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. त्यांनी या कामी निधी देण्याचे मान्य केले आहे. महायुतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शिवारात पाणी फिरवण्याचे आमचे स्वप्न आहे. बारामतीच्या जिरायती भागाचा जिरायत हा शब्दच मी कायमस्वरूपी मिटवून टाकणार आहे. मतदारसंघातील अन्य तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही महायुतीचे नेते मतभेद, वाद विसरून एकत्र आलो आहोत, आता तुम्ही साथ द्या. विरोधकांकडे मोदींवर टीका करण्यासारखे काहीही नाही.

बारामतीतील संस्था कोणी उभ्या केल्या याचा ऊहापोह करून पवार म्हणाले, 'मेडिकल कॉलेज, आयुर्वेद कॉलेज, पोलिस उपमुख्यालय, बसस्थानक ही कामे कोणी केली. बारामतीत आता 2413 कोटींची विविध कामे सुरू आहेत. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचेही समर्थन करतो. सर्व प्रकारच्या आरक्षणाला आमचा पाठींबाच असेल. मी कोणावर टीका करणार नाही, कारण विकासावर बोलण्यासाठी माझ्याकडे भरपूर काही आहे. विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करतात, मोदी संविधान बदलणार अशी वल्गना करतात, त्याला भुलू नका, असे आवाहन त्यांनी केले.'

सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'माझ्या आजे-सासू शारदाबाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी राजकारणात उतरले आहे. शारदाबाई या बाहेरून पवार कुटुंबात आल्या. त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात निवडणूक लढवली. लोकल बोर्डावर गेल्या. पवारांच्या सुनेला बारामतीकरांनी तेव्हाही स्वीकारले होते, आताही ते स्वीकारतील. शारदाबाईंच्याच सामाजिक कार्याचा वारसा मी पुढे नेईन.'
या वेळी अन्य वक्त्यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप, अनिल सावळे पाटील यांनी केले.

 ..तर मुंबई गाठावी लागेल, सुप्रिया सुळेंना इशारा

त्या लोकसभेत गेल्या, तर त्यांचे पती पर्स घेऊन मागे जातील का, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याचा समाचार अजित पवार यांनी घेतला. अजित पवार पर्स घेऊन मागे फिरणा-यातला आहे का, तुम्ही संसदेत जाताना सदानंद सुळे पर्स घेऊनच जात होते का, असा सवाल करून अजित पवार म्हणाले, मी पण उत्तरे देऊ शकतो. अशी उत्तरे देईन की तुम्हाला पळता भुई थोडी होईल. थेट मुंबई गाठाल. 15 वर्षांत केंद्राचा निधी आणला नाही. आता मोदी-शहांवर टीका करून, 'संसदरत्न' पुरस्कार मिळवून विकास होईल का, तुमची टीका फक्त कानाला ऐकायला बरी वाटेल, असे अजित पवार म्हणाले. वडीलधार्‍यांचा मी अनादर करणार नाही. वडीलधार्‍यांपुढे नेहमी नतमस्तकच होईन, पण विकासाचा हिस्सा का बनू नये, असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले.

कुस्तीतले डाव तरी कळतात का, युगेंद्रवर हल्लाबोल

युगेंद्र पवार यांचा नामोल्लेख टाळून अजित पवार म्हणाले, हे आयुष्यात कधी कुस्ती खेळले नाहीत अन् बारामती कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष झाले. अरे बाबांनो, तुम्ही लय उड्या मारू नका. हे औटघटकेचे आहे. आज जे पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत, ते मतदान झाल्यावर 8 तारखेला कुठे असतील, हे तुम्ही बघा.

गर्दी होणार नाही म्हणून खुर्च्या टाकल्या

विरोधकांनी सांगता सभेला गर्दी होणार नाही म्हणून खुर्च्या टाकल्या. आम्ही इथे खुर्च्या टाकल्या असत्या, तर तुमच्या चौपट गर्दी दिसली असती. बारामतीच्या मिशन बंगला मैदानावर मी आजवर अनेक सभा घेतल्या, पण आजच्या एवढी गर्दी बघितली नाही, हे पैसे देऊन आणलेले लोक नाहीत, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली.
बाळकडू पाजणार्‍याला सांगणार का; रोहित पवारांवर टीका

महाविकास आघाडीच्या सभेत आ. रोहित पवार भावनिक झाले, त्याचा संदर्भ अजित पवार यांनी दिला. मी म्हणालो तसेच झाले की नाही, असे सांगत ते म्हणाले, असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा, खणखणीत नाणे दाखवा, रडीचा डाव चालणार नाही. त्यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिले. हडपसर विधानसभा मागितली, तर कर्जत-जामखेड दिले. आता ते माझ्यावर टीका करतात. अरे बाबा, राजकारणाचे बाळकडू मी तुला दिले. तुझ्यापेक्षा मी कितीतरी उन्हाळे- पावसाळे अधिक बघितले आहेत, या शब्दांत अजित पवार यांनी रोहित पवार यांचा समाचार घेतला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news