पिंपरी : स्मार्ट सिटीचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर वर्षभरापासून अपूर्णच

पिंपरी : स्मार्ट सिटीचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर वर्षभरापासून अपूर्णच
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या वतीने सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर निगडी येथील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल येथे सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीपुरते सेंटर कार्यान्वित केले होते. तितकेच काम वर्षभरापासून कायम असून, त्यात काहीच भर पडली नसल्याचे चित्र आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या या कासव गती कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरावर हजारो सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे 24 तास ठेवण्यासाठी निगडी येथे हे सेंटर उभारण्यासाठी तब्बल 441 कोटी 23 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच, महापालिकेचा डाटा तेथे संग्रहित करण्यात आला आहे. त्यासाठी शहरात सुमारे 600 किलोमीटर अंतराचे फायबर केबल नेटवर्कचे जाळे विणण्यात आले आहे. या कामाची मुदत मार्च 2022 ला संपली आहे. मात्र, अद्याप हे सेंटर 100 टक्के कार्यान्वित झालेले नाही.

गेल्या वर्षी 15 ऑगस्टला तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भागांवर पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, घनकचरा व्यवस्थापन आदी कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंटर कार्यान्वित केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित 7 क्षेत्रीय कार्यालय हद्दीचा भाग सेंटरला जोडून त्यावर 24 तास नियंत्रण ठेवले जाईल. दोन ते तीन महिन्यांत सेंटर 100 टक्के कार्यान्वित होईल, असा दावा करण्यात आला होता.

मात्र, वर्ष लोटले तरी, अद्याप इतर सात क्षेत्रीय कार्यालयांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात झालेली नाही. त्यावरून स्मार्ट सिटीचे कामकाज कासव गतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या कामास मुदतवाढ देण्याचा सपाटा स्मार्ट सिटी कंपनीने लावला आहे. तसेच, नाममात्र दंड करून ठेकेदार कंपनीच्या लेटलतिफ कामास अभय दिले जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही शहराला सेंटरचा 100 टक्के लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

  • तत्कालीन आयुक्तांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला केले होते उद्घाटन
  • 'अ' सोडून इतर सात क्षेत्रीय कार्यालयांचे कामे सुरू करण्यास अपयश

सप्टेंबरमध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची जोडणी पूर्ण होईल

फायबर केबल नेटवर्किंगचे काम अपूर्ण असल्याने सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची जोडणी सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरशी झालेली नाही. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले आहे. काम झाल्यानंतर ते सर्व कॅमेरे सेंटरला जोडण्यात येणार आहेत. सध्या 90 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे सेंटरला जोडण्यात आले आहेत. सप्टेंबरपर्यंत सर्व कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील. त्यामुळे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news