वेल्हे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच रविवारी (दि. 13) सिंहगड, राजगड आणि तोरणा किल्ले पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले. या ऐतिहासिक किल्ल्यांवर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला चौपाटी परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली.
दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पर्यटकांची गर्दी अधिकच वाढली होती. मात्र, सिंहगड व राजगड परिसरात ढगांची दाट झालर व रिमझिम पावसाने वातावरणात थोडा गारवा निर्माण केला होता. (Latest Pune News)
खडकवासला धरण चौपाटी, डीआयटी, गोर्हे बुद्रुक, डोणजे चौक परिसरात सकाळपासूनच गर्दी उसळली होती. वाहनांच्या रांगा धरणाच्या माथ्यापासून दूर अंतरापर्यंत लागल्या होत्या. बेशिस्त पार्किंग व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अडथळ्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प झाली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांच्या नेतृत्वाखाली 25 हून अधिक पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि जलसंपदा विभागाचे रक्षक सकाळपासूनच तैनात होते. मात्र, वाहनचालकांत शिस्त नसल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागत होते.
सिंहगड वनसंरक्षण समितीकडे वाहनाने आलेल्या पर्यटकांकडून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा टोल मिळाला. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून आणि देशाच्या इतर भागांतून आलेल्या पर्यटकांनी सिंहगडावर मोठी गर्दी केली. काही विदेशी पर्यटकांचीही उपस्थिती होती. पुणे दरवाजासह गडावरील ऐतिहासिक वास्तूंना पर्यटकांनी भेट दिली.
दुपारी 12 वाजल्यानंतर सिंहगड घाट रस्त्यावर वाहनांची गर्दी प्रचंड वाढली. परिणामी डोणजे, गोळेवाडी नाका, कोंढणपूर फाटापासून गडावरील वाहनतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे काही वेळ वाहतूक बंद करून टप्प्याटप्प्याने वाहने गडावर सोडण्यात आली.
वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील, बळीराम वाईकर, संदीप कोळी, तसेच घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसभर घाटरस्त्यावर तैनात होते. दरम्यान, राजगड किल्ल्यावरही दिवसभरात 8 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजसदर, पद्मावती माची, संजीवनी माची परिसरात पर्यटकांची विशेष गर्दी होती.