

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील नव्या सीएनजी बस दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भाडेतत्वावरील 400 पैकी 325 नव्या सीएनजी बस आत्तापर्यंत ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरीत 75 बस याच महिनाअखेरपर्यंत ताफ्यात दाखल होणार आहेत.
सीएनजीच्या नव्या बस दाखल होत असल्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या निश्चितच वाढत आहे. मात्र, आयुर्मान संपलेल्या बसदेखील स्क्रॅपला जाणार आहेत. त्यामुळे नव्या बस दाखल होऊनही ताफ्यातील बसची संख्या वाढेल, असे काही होणार नाही. सध्या पीएमपीच्या ताफ्यात 1880 बस आहेत. पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात 2 हजारपेक्षा अधिक बस होत्या.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएभागातील लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीकडे सध्या बस संख्या अपुरी आहे. पीएमपी ताफ्यात नव्या बस आणण्याचे नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
बसची संख्या कमी झाली, तर हे दुष्परिणाम
वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत कमी बस असल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचे वहन, बससाठी प्रवाशांना तास् तास वेटिंग करण्याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय बसमध्ये उभा राहायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: कोंबाकोंबी होते. बस प्रवास हा जीवघेणा ठरतो. शिवाय बसची अधिक झीज होऊन बसच्या ब्रेकडाऊनमध्ये भर पडते.
ठेकेदारनिहाय दाखल पीएमपी बससंख्या
एक ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
दुसरा ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
तिसरा ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
चौथा ठेकेदार - 121 (अशोक लेलंड)
एकूण भाडेतत्त्वावरील सीएनजी बस - 400 बस
आम्ही भाडेतत्त्वावरील 400 सीएनजी बस दाखल होणार आहेत. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, 400 पैकी 325 बस आत्तापर्यंत ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरीत 75 याच महिना अखेरपर्यंत (जुलै 2025) ताफ्यात दाखल होतील.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल