Sinhagad Road flyover inauguration
पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी महापालिकेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. शुक्रवारी 15 ऑगस्टला पुलाची दुसरी बाजू खुली करण्याचे नियोजन आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा असून, अद्याप दोघांची वेळ मिळाली नसल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत, असेदेखील आयुक्त राम यांनी सांगितले. (Latest Pune News)
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या मार्गावरील वाहतूक वेगाने करण्यासाठी 118 कोटी रुपये खर्चून महापालिका प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे बांधकाम केले जात आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. तथापि, उड्डाणपुलाचे काम अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने झाले आहे.
स्वारगेटकडे जाणार्या राजाराम पूल चौकात असलेल्या सुमारे 650 मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर, या वर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हिंगणे येथील विठ्ठलवाडी चौकापासून सुरू होणारा आणि फनटाइम थिएटरसमोर संपणार्या लेनचा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला केला.
फनटाइम थिएटरपासून सुरू होणारी आणि विठ्ठलवाडी चौकाच्या पेट्रोल पंपाजवळ संपणारी उड्डाणपुलाची दुसरी बाजू कधी खुली होणार, हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. महापालिका प्रशासनाने हा उड्डाणपूल जून 2025 पर्यंत नागरिकांसाठी खुला होईल, असा दावा केला होता. त्या द़ृष्टीने पुलाचे कामदेखील वेगाने सुरू केले होते.
मात्र, पावसामुळे दुसर्या बाजूचे काम रखडले. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यावर उड्डाणपुलाचे काम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले असून, 15 ऑगस्ट रोजी उड्डाणपुलाच्या दुसर्या बाजूचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे.
सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर डांबरीकरणासह इतर कामे पूर्ण झाली आहेत. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पचे कामही पूर्ण झाले आहे. यासोबतच उड्डाणपुलावर पथदिवेही बसवण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अधिकार्यांनी 15 ऑगस्ट रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
तथापि, त्यांनी मान्य केले की, 15 ऑगस्टपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, उड्डाणपुलाचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी होईल, असे मानले जाते. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे.