Indapur police bullet silencer action
इंदापूर: इंदापूर पोलिसांनी बुलेटराजांना मोठा दणका दिला. कर्णकर्कश आवाज करणार्या तब्बल 35 बुलेट दुचाकींवर मंगळवारी (दि. 12) पोलिसांनी कारवाई केली.
या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल 35 हजार रुपयांचा दंडदेखील वसूल केला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर आणखी कठोरातील कठोर कारवाई करण्याचा इशारा बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिला आहे. (Latest Pune News)
या वेळी राठोड म्हणाले, इंदापूर शहर व परिसरात अलीकडील तरुणाई बुलेटगाड्यांचा मोठमोठ्याने आवाज करून सायलेन्सरमध्ये फटाका फोडतात. यातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते तसेच परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास वाढत आहे. त्यामुळे अशा बुलेटचालकांवर कारवाई केली आहे. त्यात 35 बुलेटचे सायलेन्सर बुलडोझरच्या साह्याने नष्ट केले आहेत.
1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये रस्त्यावर नो-पार्किंगमध्ये वाहने उभ्या 156 दुचाकी तसेच ट्रिपल सीट प्रवास करणार्या 11 जणांवर, काळ्या काचा असलेल्या 55 कारचालकांवर आणि नंबरप्लेट नसलेल्या 40 जणांसह सायलेन्सरमध्ये बदल करणार्या 65 जणांवर कारवाई केली आहे.
यापुढेही वाहतुकीचे नियम पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे; अन्यथा कारवाई करणार असल्याचेही राठोड यांनी स्पष्ट केले.या वेळी इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलिस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलिस, पोलिस पाटीलउपस्थित होते.