

खडकवासला: ऐन उन्हाळ्यात घनदाट वृक्षवेली आणि हिरवाईने बहरलेल्या सिंहगड-पानशेतच्या जंगलात भीषण वणव्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या मौल्यवान वनसंपदेसह वन्यजीव भस्मसात झाले आहेत. असे असताना वनप्रशासन मात्र, सुस्त असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
बुधवारी (दि. 25) दुपारी सिंहगड किल्ल्याच्या डोणजे, अतकरवाडी येथील जंगलात भीषण वणव्यांत प्रचंड प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. जंगलात भीषण वणव्यांचे तांडव सुरू होते. वन विभागाने अर्ध्या तासात वणवा आटोक्यात आणल्याने सुदैवाने घनदाट जंगल वाचले.
वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर, संदीप कोळी, वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी नितीन गोळे, रमेश खामकर, धनाजी सांबरे, नीलेश सांगळे, गणेश सांबरे, शिवाजी लांघे, लहू पवार आदींनी तत्काळ घटनास्थळी जात यंत्राच्या साहाय्याने वणवा नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
सिंहगडच्या अतकरवाडी जंगलात बुधवारी दुपारच्या सुमारास वणव्यांच्या तांडवात वनराईसह मौल्यवान वनसंपदा भस्मसात झाली. सिंहगड किल्ल्याच्या चहूबाजूच्या जंगलासह पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण परिसरात वणव्यांची मालिका सुरूच असून, दररोज लागणाऱ्या वणव्यांमुळे लाखो रुपयांच्या वनसंपदेसह जनावरांचा चारा, शेतकऱ्यांच्या फळबागा आदी भस्मसात होत आहे. निळकंठेश्वर, जर्सेश्वर डोंगरासह रुळे, निगडे, मोसे, ओसाडे, वरदाडे, सोनापूर, सांगरुण, मांडवी आदी ठिकाणचे डोंगर जळून काळे पडले आहेत.
सध्या कडकडीत उन्हं पडत आहे व जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे काही क्षणातच जंगलातील वणवे उग््रा रूप धारण करीत आहेत. भीषण वणव्यात वनराई, चारा जळून भस्मसात झाला आहे. वन विभागाने वणवे आटोक्यात आणण्यासाठी जाळरेषा, आग प्रतिबंधक पथके आदी उपाययोजना करूनही सिंहगड, पानशेतसह परिसरातील जंगलात वणव्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे वन विभाग हतबल झाल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
अतकरवाडी जंगलातील वणवा सुरक्षारक्षक व वन कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आटोक्यात आणला. केवळ अर्धा- पाऊण हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग
वणव्याचा फटका वन्यजीवांना बसला आहे. वणवे लावून समाजकंटक पसार होत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने दररोज वणवे लागत आहेत.
नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद, पुणे