वेल्हे: रिमझिम पाऊस आणि दाट धुक्यांंनी वेढलेल्या सिंहगड किल्ल्यावर रविवारी (दि. 6) हजारो पर्यटकांनी वर्षाविहारासाठी गर्दी केली होती. खडकवासला धरण चौपाटीसह परिसर सकाळपासूनच पर्यटकांनी फुल्ल झाला होता.
त्यामुळे चौपाटीच्या तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला. वाहनांच्या दूर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे आषाढी यात्रेसाठी जाणार्या वारकर्यांसह नागरिकांचे हाल झाले. (Latest Pune News)
सिंहगड किल्ल्यावर वाहनाने जाणार्या पर्यटकांकडून वन विभागाने रविवारी जवळपास एक लाख रुपयांचा टोल वसूल केला. थोड्याशा उघडीपीनंतर पडणार्या रिमझिम पावसाची हजेरी तसेच दाट धुक्याची पर्वा न करता सुटीच्या दिवशी वर्षा विहाराचा आनंद साजरा करण्यासाठी सिंहगडावर तरुणाईची मोठी गर्दी उसळली होती.
गडावरील वाहनतळापासून पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, नरवीर तानाजी मालुसरे समाधी, छत्रपती राजाराम महाराज समाधी आदी परिसरासह गडावर धाट धुक्याची चादर पसरली होती. थंडगार वारे, दाट धुके आणि रिमझिम पावसात गरम कांदाभजी, झुणका भाकर तसेच अन्य खाद्यपदार्थ खाण्यासाठी पर्यटकांनी स्टॉलवर गर्दी केली होती.
सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू होती. सिंहगड घाटरस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी झाली. त्यामुळे डोणजे-गोळेवाडी नाका, कोंढणपूर फाट्यापासून गडावरील वाहनतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
त्यामुळे या मार्गावर वाहतूक काही काळ बंद करून टप्प्या-टप्प्याने वाहने गडावर सोडण्यात येत होती, तरीही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्यासह वन कर्मचारी, सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली होती. खडकवासला धरण चौपाटीवर सकाळपासून हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती.
पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटीसह डोणजे, खानापूर चौक, कोल्हेवाडी फाटा, किरकटवाडी फाटा आदी ठिकाणी वारकरी, नागरिकांसह पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले. पुण्यासह राज्यातील तसेच देशभरातील पर्यटकांनी गडावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती घेत, विलोभनीय निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद घेतला.
थंडगार वारे, रिमझिम पावसात सिंहगडावर अतकरवाडी व इतर पायी मार्गाने जाणार्या पर्यटकांची वर्दळही वाढली होती. पावसामुळे घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनरक्षक बाळासाहेब वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे आदीसह घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक सायंकाळी उशिरापर्यंत घाट रस्त्यावर तैनात होते.