

भिगवण: तक्रारवाडी येथील पाणी शुध्दीकरण केंद्रातून देण्यात आलेल्या पाण्यात एका ग्रामस्थाला सापाचे पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा निव्वळ राजकीय खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे स्पष्टीकरण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी दिले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, तक्रारवाडी येथील ग्रामस्थ राजेंद्र उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी रविवारी (दि.6) नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीरण केंद्रातून मोठ्या बाटली मध्ये पाणी आणले. (Latest Pune News)
घरी आल्यानंतर त्यांना त्या बाटलीत सापाचे पिल्लू नजरेस येताच त्यांनी त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आणि सर्वत्र खळबळ उडाली. हा प्रकार ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा आरोप गोडसे यांनी केला. याबाबत ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशा जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार घडुच शकत नाही असा दावा केला.
सतत साठवण पाण्याची टाकी स्वच्छ केली जाते. गावात विद्यमान सरपंचांवर नुकताच अविश्वास ठराव आणला आहे. आपण मागासवर्गीय असल्याने यात खोडसाळपणा वाटत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
नुकताच अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सरपंच(सदस्य) मनीषा वाघ यांनीही पाण्यात सापाचे पिल्लू निघाल्याच्या वृत्त खोटे असल्याचे सांगत फिल्टर योजना तंत्रशुद्ध आहे. त्यातून सापाचे पिल्लू येऊच शकत नाही असा दावा केला. आरोप करणारे ग्रामस्थ गोडसे यांनी रविवारी पाणीच नेलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुळात तर दर पंधरा,वीस दिवसाला टाकी स्वच्छ केली जाते. वारीच्या पार्श्वभूमीवर देखील टाकीची स्वच्छता करण्यात आली होती असे मनीषा वाघ यांनी सांगितले आहे. तर गोडसे म्हणाले, तुमचे राजकारण तुम्हांला लखलाभ आहे.
हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. सदरचे पाणी फिल्टर केल्यानंतर साठवणूक केले जाते व ते नागरिकाना एटीएम द्वारे दिले जाते. त्याच प्रमाणे रविवारी पाणी आणले व त्यात सापाचे पिल्लू निघाले. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.