भामा आसखेड: खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 54.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांना शेतीसह पिण्याचे पाणी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण एमआयडीसीकरिता पिण्याचे पाण्यासाठी हे धरण महत्त्वाचे आहे. परिसरातील समाधानकारक पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.
मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने धरणक्षेत्रात चांगली भर पडली असून जलसाठा हळूहळू वाढून स्थिरावू लागला आहे. यामुळे पाणी व्यवस्थापन करणार्या जलसंपदा विभागाला दिलासा मिळाला आहे. वरील चार तालुके आणि पुणे, पिंपरी चिंचवड मनपा व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांसाठी ही बाब समाधानकारक मानली जात आहे. (Latest Pune News)
भामा आसखेड हे धरण 8.14 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरणात 4.64 टीएमसी पाणीसाठा झाला. सध्या धरणातील पाण्याची पातळी 664.01 मीटर असून धरणाचा एकूण पाणीसाठा 131.316 दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा 117.794 दशलक्ष घनमीटर आहे.धरणात 442 मिलिमीटर पाऊस पडला असल्याची नोंद धरण प्रशासनाकडे झाली.
पावसाळ्यापर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर लाभ क्षेत्रातील संपूर्ण शेती हंगाम व पिण्यासाठी पाणीटंचाईची समस्या वर्षभर उद्भवणार नाही. सध्या पडत असलेल्या पावसाने जलसाठ्यात सतत वाढ होत असल्याची माहिती धरण प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता अश्विन पवार व शाखा अभियंता नीलेश घारे यांनी दिली.