

पुणे: काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले आणि आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. दुःख सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. कारण, समोर लहान मुलीची जबाबदारी होती. तिच्यासाठी वडील आणि आई, अशा दोन्ही भूमिका निभावत जीवनाचा प्रवास सुरू ठेवला. अनेक अडचणी आल्या; पण खचलो नाही. मुलीच्या भवितव्यासाठी प्रत्येक संकटावर मात केली. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि माझा आधार बनली आहे, अशा भावना व्यक्त करीत हेमंत (नाव बदलले आहे) यांनी एकल पालकत्वाचा प्रवास उलगडला.
सोमवारी (दि. 1 जून) साजऱ्या होणाऱ्या ’जागतिक पालक दिना’निमित्त दै. ’पुढारी’ने एकल पालकांशी (सिंगल पॅरेंट) संवाद साधला. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे एकल पालकत्वाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट, जोडीदाराचे निधन, विभक्त राहणे किंवा इतर कारणांमुळे अनेक पालक मुलांचा सांभाळ एकट्याने करीत आहेत.
मात्र, या प्रवासात त्यांना केवळ आर्थिक जबाबदाऱ्याच नव्हे, तर मुलांचे शिक्षण, आरोग्य, भावनिक आधार, संस्कार आणि करिअर यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे. विशेषतः शहरांमध्ये एकल पालक कुटुंबांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा कुटुंबांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलत आहे. एकेकाळी सहानुभूती किंवा शंकेच्या नजरेने पाहिले जाणारे हे पालक आज जिद्द, त्याग, स्वावलंबन आणि निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक ठरत आहेत.
एकल पालक असलेल्या नोकरदार आसावरी कुलकर्णी म्हणाल्या की, पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. नोकरी सांभाळत मुलांना वाढवणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे आणि प्रत्येक प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही मोठी कसोटी होती. आई आणि वडील, अशा दोन्ही भूमिका निभावताना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. मात्र, मुलांशी मोकळा संवाद ठेवला. त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे हा प्रवास थोडा सोपा झाला. आज मुलगी संसारात स्थिरावली आहे आणि मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यांचे यश, हेच माझ्या संघर्षाचे खरे फळ आहे.
एकल पालकत्वातील प्रमुख आव्हाने
आर्थिक जबाबदाऱ्यांचा वाढता ताण
मुलांसाठी वेळ आणि करिअर यांचा समतोल
मानसिक व भावनिक तणाव
समाजातील पूर्वग््राहांना सामोरे जाण्याची वेळ
मुलांच्या सर्वांगीण विकासाची एकट्याने जबाबदारी