

सुनील जगताप
पुणे: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या 12 कोटी 45 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमएओ) माजी सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अनेक महिने उलटले आहेत. तरीही कोट्यवधी रुपयांचा हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशेब अजूनही गुलदस्त्यात असल्याने क्रीडाविश्वातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची मूळ बिले आणि पावत्या शासनाला सादर केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक असोसिएशनला याचा पूर्णपणे विसर पडला असून, केवळ जुजबी ऑडिट रिपोर्ट सादर करून वेळ मारून नेली जात असल्याची चर्चा क्रीडापटूंमध्ये रंगली आहे.
2022 ते 2025 दरम्यान गुजरात, गोवा आणि उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंचे कोचिंग कॅम्प्स आणि सहभागासाठी हा निधी देण्यात आला होता. नियमानुसार 31 मार्चअगोदर मूळ बिलांसह हिशेब देणे बंधनकारक असतानाही गुजरात नॅशनल गेम्स वगळता इतर स्पर्धांच्या खर्चाचा कोणताही ठोस तपशील मिळालेला नाही. गुजरात स्पर्धेचे ऑडिट रिपोर्ट जोडले असून, मूळ बिल अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पुढे आलेली आहे.
या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल असूनही, हा विषय आता हळूहळू मागे पडत चालला आहे. शासकीय तिजोरीवर उघड डल्ला मारलेला असताना क्रीडा विभाग मूळ बिलांची मागणी का करत नाही, असा संतप्त सवाल खेळाडूंकडून उपस्थित होत आहे. क्रीडा विभागाच्या शांततेवर संशय व्यक्त होत असून भष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का? अशी शंका काहीजण बोलून दाखवत आहेत.
आंदोलनकर्त्यांची ‘मेरी भी चुप...’
दरम्यान, एमएओचे तत्कालीन सरचिटणीस यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा हिशेब दिला नसल्याने त्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मात्र शांततेची भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, ‘मेरी भी चुप... तेरी भी चुप...’ अशी काहीशी परिस्थिती असल्याची चर्चा खेळाडूंमध्ये रंगली आहे.
एमएओचे अध्यक्ष स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर काही प्रमाणात याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक महिन्याला एक पत्र नामदेव शिरगावकर यांना देण्यात आलेले आहे. परंतु, या सहा ही पत्रांची उत्तरे त्यांच्याकडून आलेली नाहीत. यासदंर्भात नवनिर्वाचित अध्यक्षांकडे हा विषय मांडून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
संजय शेटे, सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन