

नवी दिल्ली : 2,100 भारतीय शीख भाविकांच्या एका मोठ्या गटाने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये मंगळवारी प्रवेश केला. मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील भूमी मार्ग बंद झाला होता आणि अशा परिस्थितीत हा पहिला लोकांचा संपर्क ठरला आहे.
पाकिस्तान सरकारने शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजींच्या 556 व्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित 10 दिवसीय उत्सवात सहभागी होण्यासाठी 2,150 भारतीय भाविकांना व्हिसा मंजूर केला होता. सुरुवातीला भारताने सुरक्षेच्या कारणास्तव या यात्रेला परवानगी नाकारली होती; मात्र शीख संघटनांच्या विनंतीनंतर सरकारने आपला निर्णय बदलला आणि हा प्रतीकात्मक जथ्था पाठवण्याची परवानगी दिली.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वाघा चेकपोस्टवर भारतीय भाविकांचे फुलांनी स्वागत केले. पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष रमेशसिंग अरोरा आणि इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे प्रमुख साजीद महमूद चौहान यांनी या यात्रेकरूंचे स्वागत केले. सरकारने या यात्रेत फक्त भारतीय नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी दिली असून, एनआरआय भाविकांना परवानगी न देण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे भाविक बुधवारी लाहोरपासून सुमारे 80 कि.मी. पश्चिमेस नानकाना साहिब येथे जमतील.
या प्रवासामध्ये ते गुरुद्वारा पंजा साहिब हसन अब्दाल आणि गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर येथे भेट देतील.
हा संपूर्ण जथ्था 13 नोव्हेंबर रोजी भारतात परतणार आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे बंद अटारी-वाघा सीमा सुमारे 5 महिन्यांनंतर लोकांसाठी अंशतः उघडली गेली. 2,100 शीख भाविकांचा जथ्था गुरू नानक देवजींच्या 556 व्या प्रकाश पर्वासाठी जात आहे.