

पुणे: शहरात मंद प्रकाशातील ‘त्या’ व्यवसायाची मोठी व्याप्ती आहे. मसाज सेंटरच्या (स्पा) नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून मागील वर्षभरात पुणे पोलिसांनी 38 विदेशी तरुणींची सुटका केली असून, स्पा चालक, मॅनेजरसह 93 दलालांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे. शहरात ‘थाई स्पा’ची चलती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथे काम करणाऱ्या बहुतांश तरुणी थायलंड येथील आहेत.
सुरुवातीला या तरुणी पर्यटनसह अन्य व्हिसावर भारतात प्रवेश करतात. पुढे त्या स्पा सेंटरमध्ये थेरपिस्ट म्हणून नोकरीला लागतात. निर्धारित नियमानुसार त्यांना पर्यटन व्हिसावर भारतात आल्यानंतर नोकरी करण्याची परवानगी मिळत नाही. परंतु असे असले तरी सर्रास त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. पोलिसांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात. या तरुणींकडून भारतात आल्यानंतर सुरुवातीला वास्तव्याचा एक पत्ता दिला जातो. मात्र, पोलिसांनी तपासले तर त्या तेथील पत्त्यावर आढळून येत नाही. तर काही विदेशी तरुणी नोकरीच्या नावे भारतात येतात. येतांना संबंधित कंपनीचा संदर्भ देतात. मात्र, प्रत्यक्षात त्या तेथे काम करत नाहीत. या विदेशी तरुणींवर परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई केली जाते.
त्यांना प्रथम भारत सोडून जाण्याबाबत नोटीस दिली जाते. त्याचा पाठपुरावा केला जातो. परंतु त्यानंतर देखील विदेशी तरुणी मायदेशी गेल्या नाही तर त्यांना सक्तीने भारताबाहेर पाठवून दिले जाते. अशात एफआरओकडून किती कारवाई केली जाते, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 58 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पोलिस ठाण्यांकडून 44 गुन्हे दाखल केले आहेत. तर, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने 14 गुन्हे दाखल केले आहेत. स्पामधील वेश्या व्यवसायात अडकलेल्या 207 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यामध्ये 38 विदेशी महिला असून, 169 भारती महिला आहेत.
तर, तीन अल्पवयीन मुली देखील मिळून आल्या आहेत. याप्रकरणी 93 दलालांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 2024 या वर्षात मसाज सेंटरमधील वेश्या व्यवसायाच्या संदर्भात 33 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्षाने 20, तर स्थानिक पोलिस ठाण्यांकडून 12 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये पोलिस ठाण्यांकडून सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्तांचा धसका
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात स्पा सेंटरवर कारवाया करण्यात आल्यात. त्यामुळे अनेक दलालांनी स्पाची दुकाने बंद करून शहरातून काढता पाय घेतला आहे. जानेवारी 2025 मध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवणारा दलाल धनराज शामराव जाधव याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली. नुकतेच त्याला पकडून वानवडी पोलिसांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे स्पा व्यवसायातील दलालांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पाहा आकडे काय बोलतात
(1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 कारवाई )
दाखल गुन्हे: 58
अटक आरोपी: 93
पीडित महिला: 207
विदेशी: 38
भारतीय: 169
अल्पवयीन मुली: 03