

परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी मार्गशीर्ष वद्य अमावास्येनिमित्त पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविक मुक्कामी येत असल्याने वीर व परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात गुलाल उधळत अनेक भक्तांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. परंपरेनुसार कोडीत येथून पायी वारी करीत अनेक भाविक श्रीक्षेत्र वीर येथे आले होते. तसेच, वीर येथील दर्शनानंतर अनेक भाविक श्रीनाथांचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र घोडेउड्डाण येथेही दर्शनासाठी रवाना झाले. पहाटे 4 वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 5 ते 6 या वेळेत देवांच्या विश्रांतीसाठी मुख्य गाभारा बंद ठेवण्यात आला होता.
त्यानंतर सकाळी 6 वाजता पुन्हा दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला. दिवसभर दगडी कासवावर पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने सकाळपासून अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता दही-भाताची पूजा करून देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारी 12 वाजता धुपारतीनंतर गाभारा बंद करण्यात आला व दुपारी 1.15 वाजता पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. महाप्रसादाचे आयोजन सदाबापू धोंडीबा सातव, दिवंगत शंकरराव धुमाळ व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. याच वेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी देवस्थानचे सर्व विश्वस्त, सल्लागार, मानकरी, सालकरी, पाटील आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वच्छ पाणी, दर्शनबारीची व्यवस्था, अतिरिक्त होमगार्ड, प्रकाशयोजना व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या यात्रा-उत्सवाच्या तयारीसाठी संपूर्ण मंदिर व्यवस्थापन सज्ज असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, विश्वस्त व सल्लागारांनी दिली.
श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रेची ओढ
श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वाधिक दिवस चालणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. येत्या 1 फेबुवारीपासून 12 फेबुवारीपर्यंत यात्रा भरणार असल्याने भाविकांमध्ये वीर यात्रेची उत्सुकता वाढली आहे.