

श्रीकांत शिरोळे
माझ्या पहिल्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी पुण्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते कै. एसेम जोशी यांनी कंबर कसली होती. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे ते प्रचारप्रमुख होते, तर माझ्या प्रचाराची धुरा होती कै. भाऊसाहेब शिरोळे यांच्यावर.
1962 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेबांनी रामभाऊ तेलंग यांचा प्रचार करून एसेम जोशींचा पराभव केला होता. तो बहुधा एसेम यांच्या मनाला लागला असावा, त्यामुळे प्रचारादरम्यान भाऊसाहेब समोर येताच, आता मी श्रीकांतला पराभूत करणार आहे, असे आव्हानच दिले. त्यावर भाऊसाहेबांनी केवळ स्मितहास्याने उत्तर दिले होते.(Latest Pune News)
झी 1968 मधील ही पहिली निवडणूक, अशा अनेक घटनांनी अविस्मरणीय ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा नुकताच बिगुल वाजला आहे. त्यामुळे या साऱ्या आठवणी मनात घोळू लागल्या आहेत. महानगरपालिकांच्या (1968 आणि 1992 मध्ये झालेल्या) दोन निवडणुका मी लढविल्या असून, या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या कारणांसाठी अविस्मरणीय ठरल्या होत्या.
महाविद्यालयात शिकत असतानाच 1968 मध्ये महापालिकेची निवडणूक लढण्याची संधी मला मिळाली. माझे राजकारणात पदार्पण याच निवडणुकीमुळे झाले. त्या वेळी माझे वय 18-19 वर्षांचे होते. तांत्रिकदृष्ट्या मी अल्पवयीन होतो. वडील भाऊसाहेब लक्ष्मणराव शिरोळे पाटील पुण्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ, किंगमेकरच. लोकसभा, विधिमंडळ आणि महानगरपालिकेत कोणाला संधी द्यायची, कोणाला निवडून आणायचे, हे सर्व तेच ठरवीत. 1946 ते 1976 या काळात ते सक्रिय राजकारणात होते. 1946 ते 1962 या काळात ते पुणे नगरपालिकेत आणि महानगरपालिकेचे सभासद होते. 1957 मध्ये बिनविरोध महापौर झाल्यावर पुण्याचे राजकीय नेतृत्व त्यांच्याकडे चालत आले.
मी 1965 सालापासून शिवाजी महाराजनगर गावठाण येथील गणेशोत्सवात सक्रिय होतो. सलग तीन वर्षे सेक्रेटरी म्हणून काम केले असल्याने स्थानिक वर्तुळात कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली होती. 1968 साली एक सदस्य मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पुण्यातील निवडणूक जाहीर झाल्या. गावठाणातील राजकारणात प्रचंड उलथापालथ होऊन शेवटी येथील उमेदवारीची माळ माझ्या गळ्यात पडली. भाऊसाहेबांवर मतदारांचा प्रचंड विश्वास म्हणून राजकीय अनुभव शून्य असतानाही मी महानगरपालिकेत निवडून आलो. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात एकही भाषण केले नाही किंबहुना त्याची गरजही पडली नाही. मात्र, महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत, महापौर निवडणुकीत भाषण केले. अनेक सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले म्हणून आत्मविश्वास निर्माण झाला आणि नंतर नियमितपणे विविध विषयांवर भाषणे केली.
माझ्या वयाच्या मुद्द्यावरून पराभूत उमेदवाराने पुणे येथील लघुवाद न्यायालयात माझ्याविरूद्ध याचिका दाखल केली होती. लघुवाद न्यायालयाने 3 मे 1969 रोजी ती मान्य करून माझे सभासदत्व रद्द केले. लघुवाद न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध वडील भाऊसाहेब शिरोळे आणि त्यांचे सहकारी कै. बाळासाहेब गिते यांनी रातोरात लोणावळ्यात जाऊन बॅरिस्टर रामराव आदिक यांना गाठले व त्यांना गाडीतून मुंबईला परळ येथील त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. आदिक साहेबांनी लागलीच अपील तयार करून मुंबई उच्च न्यायालयात सुटीच्या कोर्टात दाखल करून लघुवाद न्यायालयाच्या या आदेशाला मनाई मिळवली. नंतर न्यायमूर्ती देसाई आणि न्यायमूर्ती वैद्य यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी माझ्या वतीने प्रख्यात विधिज्ञ राम जेठमलानी यांनी युक्तिवाद केला, तर पराभूत उमेदवाराच्या वतीने पुण्यातील प्रख्यात कायदे पंडित वा. ब. गोगटे उभे होते. उच्च न्यायालयाने माझे अपील मान्य करून नगरसेवक म्हणून माझी निवड कायम केली.
राम जेठमलानी यांची युक्तिवाद करण्याची पद्धत पाहून मी प्रभावित झालो. त्यामुळेच आपणही वकील झाले पाहिजे, हे मनोमन ठरविले आणि नगरसेवक असतानाही कायद्याचा अभ्यास सुरूच ठेवला. अंतिम परीक्षेत पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्यानंतर आदरणीय कै. विजयराव मोहिते सरांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी वकिली सुरू केली.
माझी दुसरी निवडणूक 1992 ची. जून 1991 पासून पोटदुखीने त्रस्त होतो. विविध पॅथींचे उपचार घेतल्यानंतर डॉ. मनोहर जोशींचा सल्ला घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार अल्सरची शस्त्रक्रिया करवून घ्यायचा निर्णय घेतला. 31 डिसेंबर 1991 ला सकाळी पोटाच्या या मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरा गेलो. शस्त्रक्रियेची ही बातमी सगळ्या मतदारसंघात पसरली. त्यामुळे भेटीसाठी दवाखान्यात कार्यकर्त्यांची रीघच लागली. घरी परतल्यावरही भेटण्यास येणाऱ्यांची वर्दळ सुरूच होती. तरुण कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक विचारपूस करण्यासाठी बंगल्यावर येत होते. एके दिवशी अचानक काही तरुण कार्यकर्ते माझ्या खोलीत आले आणि आगामी निवडणुकीत मी उभे राहावे म्हणून आग््राह करू लागले. प्रकृतीच्या कारणावरून मी नकार दिल्यानंतरही ते आग्रह सोडेनात. शेवटी त्यांना बरे वाटावे म्हणून मी होकार दिला. बरे वाटू लागल्यानंतर मतदारसंघात फेरफटका मारून ऑफिसमध्ये आलो असता एका कार्यकर्त्याकडे निवडणूक खर्चासाठी तीन हजार रुपये दिले आणि निवडणुकीच्या कामाला सुरुवात करायला सांगितले. उद्यापासून लागतील तसे पैसे देतो, असेही त्याला सांगितले. 1 फेबुवारीला मी अर्ज भरला तेव्हा सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले होते. त्यामुळे अपक्ष म्हणून उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. 4 फेबुवारीपर्यंत सगळ्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले होते. 25 फेबुवारीला मतदान आणि रात्री लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. प्रत्येक कार्यकर्त्याने जीव ओतून काम केले. परिणामी, प्रचंड मतांनी विजयी झालो. विजयाची मिरवणूक सुरू असतानाच तो कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि माझ्या हातात पाचशे रुपये ठेवून म्हणाला तुम्ही दिलेल्या तीन हजारांपैकी हे शिल्लक राहिले आहेत. अवघ्या अडीच हजारांत निवडून आलो होतो.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)