धागा धागा विणूया…श्रीरामांसाठी! अयोध्येतील मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची राज्यातील नागरिकांना संधी

धागा धागा विणूया…श्रीरामांसाठी! अयोध्येतील मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची राज्यातील नागरिकांना संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामात आपला हातभार लागावा, अशी इच्छा असलेल्या नागरिकांना श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची संधी मिळणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठीचे वस्त्र पुण्यात विणले जाणार असून, त्यासाठी लाखो लोकांच्या मदतीने हातमागावर हे वस्त्र विणले जाणार आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुण्यात 10 ते 22 डिसेंबरदरम्यान 'दो धागे राम के लिए' हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे मांडव उभारण्यात येणार असून, वस्त्र विणण्याचे काम 24 तास सुरू राहणार आहे. पुण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यांतील, राज्यांतील नागरिक आपापल्या उपलब्ध वेळेनुसार या कामात सहभागी होऊ शकणार आहेत, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरातील प्रत्येक राज्यातून हातमाग पुण्यात आणण्यात येतील. इतकेच नव्हे तर नेपाळसह इतरही काही देशांमधून हातमाग पुण्यात आणण्यात येणार असून, त्याद्वारे वस्त्र विणले जाणार आहेत. काही मान्यवरांच्या हस्ते पहिले काही धागे विणले जातील व नंतर कोणीही नागरिक येऊन या मागांवर विणून आपले योगदान देऊ शकणार आहेत.

या उपक्रमाला 10 डिसेंबर रोजी विधिपूर्वक होमहवनाने सुरुवात होईल. वस्त्र विणण्यासोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्यासंबंधी व्याख्याने, भजन – कीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासह श्रीराम मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगणारे चित्रप्रदर्शनदेखील होईल. महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही घैसास यांनी सांगितले.

न्यासाकडे 3200 कोटी रुपयांहून अधिक रक्कम

श्रीराम मंदिर निर्माणासाठी आजवर देशातील नागरिकांकडून समर्पणाचा उपलब्ध झालेला निधी हा 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि तेवढाच निधी हा आज आमच्याकडे जमाही आहे, अशी माहिती स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली. श्रीराम मंदिरासाठी कोणी किती समर्पण दिले हे सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र, आम्ही अजून परदेशातून देणगी स्वीकारायला सुरुवात केली नाही. त्यासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया सुरू आहे. आता न्यासास तीन वर्षे पूर्ण झाले असल्याने परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही हा निधी स्वीकारू शकू.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news