

सासवड : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठ्या ११ दिवस चालणा-या श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला मंगळवारी (दि. १५) माघ शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री अडीच वाजता पार पडलेल्या पारंपारिक श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याने सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, गुलाल-खोब-याची उधळण, मानाच्या पालख्या, काठ्या, छत्र्या, अबदागिरींच्या उपस्थितीत "नाथ साहेबांच चांगभलं, सवाई सर्जाच चांगभलं"चा जयघोष, तुतारी आणि शंखनादाच्या निनादात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या भाविकांच्या आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
दरम्यान मानाची असणाऱ्या कोडीत येथील पालखीने राऊतवाडी येथील हळदीचा मान स्वीकारून रात्री आठ वाजेच्या दरम्यान श्री क्षेत्र वीर येथील वेशीवर केले. त्यानंतर वीरच्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजाने मानाच्या सर्व काठ्या आणि कोडीतची पालखी देऊळवाड्यात गेल्या. दोन मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर राऊत मंडळींनी रात्री साडेअकराच्या दरम्यान देवाला पोशाख करून ठीक १२ वाजता सर्वांना लग्नाला येण्यासाठी आवाहन केले.
त्यानंतर रात्री १२.३० वाजता दक्षिण दरवाजाने कोडीत बरोबरच राजेवाडी, भोंडवेवाडी, वाई, सोनवडी, पुणे, कन्हेरी, सुपे आदी काठ्या अंधारचिंच येथे दाखल झाल्या. त्याठिकाणी कन्हेरी आणि वाई या काठ्यांची पारंपारिक भेट झाली तसेच तरडे, ढवाण, व्हटकर, बुरुंगुले, शिंगाडे या मानक-यांचे फुलांच्या माळा घालून मानपान झाल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास सर्व काठ्या आणि कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडी या पालख्या २ वाजता सवाद्य देऊळवाड्यात दाखल झाल्या.
प्रथेप्रमाणे सर्व काठ्या व पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व मानकरी, पुजारी, विश्वस्त आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सव मूर्तींना अलंकारांनी सजविण्यात आले. त्यानंतर गुरव मंडळींनी अक्षता वाटप केल्यानंतर मध्यरात्री २.२० वाजता मंत्रोपचाराला सुरुवात झाली. अडीचच्या सुमारास मंगल अष्टकांना सुरुवात झाली व श्री नाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला. देवाचे पुजारी थीटे मंडळींनी मंगलाष्टका गायल्या. विवाह सोहळ्यानंतर काही काळ मंदिराचा परिसर फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेला. सर्व काठ्या आणि पालख्यांची पुन्हा एकदा मंदिर प्रदक्षिणा होवून लवाजमा देऊळवाड्यातून भक्त कमळाजी व तुकाई टेकडीकडे मार्गस्थ झाला. तेथे दर्शन घेवून सर्व लवाजमा भल्या पहाटे आपापल्या तळावर विसावला.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, देवाचे मानकरी, वीर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सामुहिक नियोजनातून यात्रेची तयारी केली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांटची व्यवस्था, विद्युत मनोरे उभारून प्रकाश व्यवस्था, पुरंदर पंचायत समितीच्या वतीने रुग्णवाहिका व सासवड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. मंदिर व परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ व सर्व विश्वस्त मंडळी, सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच देवाचे मानकरी, सालकरी, पुजारी, पोलीस मित्र संघटना आदि मंडळी यात्रा नियोजनावर लक्ष देत आहेत. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, विद्युत वितरण कंपनी, पोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासनाचे विविध विभाग आकरा दिवस चालणा-या या भव्य यात्रा सोहळ्याचे उत्तम पद्धतीने संयोजन करीत आहेत.
माघ शु. पौर्णिमेला मध्यरात्री २.४५ वाजता पार पडलेल्या विवाह सोहळ्यापासून ११ दिवस हा यात्रा उत्सव रंगणार असून पंचमीपासून पारंपारिक भाकणुकीचा कार्यक्रम देऊळवाड्यात सुरु होणार आहे. भाविकांच्या गजे भोजनाला देखील पंचमीपासूनच सुरुवात होते. तर माघ वद्य दशमी म्हणजेच शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पारंपारिक "मारामारी"ने (रंगाचे शिंपण) यात्रेचा समारोप होणार आहे.