

पुणे: शहरात ऑगस्टच्या 18 तारखेपर्यंत पाऊस नव्हता; मात्र त्यानंतर चारच दिवसांत संततधार पावसाने कमाल केली अन् ऑगस्टच्या सरासरीत शहर पास झाले. 1 जून ते 23 ऑगस्टपर्यंत शहरात 513.5 मि.मी.ची नोंद झाल्याने शहराची ऑगस्टची 15 ते 20 टक्के तूट भरुन निघाली.
शहरात यंदा 17 ते 27 मे या दहा दिवसांत 273 मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. जूनमध्ये 170 मि.मी. पाऊस झाला. सरासरी पेक्षा 13 ते 14 टक्के जास्त पाऊस झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने निराशा केली. शहरात 220 ते 250 मि.मी इतका पाऊस जुलैत होतो. मात्र अवघा 132 मि.मी पाऊस झाला. (Latest Pune News)
तीच गत ऑगस्ट महिन्यात झाली होती. 18 ऑगस्टपर्यंत शहरात मोठा पाऊसच नव्हता. रिमझिम पाऊस असला तरी सरासरीत 15 ते 20 टक्के तूट होती. मात्र 18 ते 21 ऑगस्ट या चार दिवसांत शहरात सुमारे 90 मि.मी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहर सरासरीत पाश झाले. अन्यथा 18 पर्यंत शहरात 410 मि.मी. ची नोंद होती. 23 ऑगस्टअखेर शहरात एकुण हंगामात 513 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
दरवर्षी 23 ऑगस्टपर्यंत शहरात 600 मि.मी. च्यावर पाऊस असतो. म्हणजे सरासरीपेक्षा 90 ते 120 मि.मी पाऊस जास्त झालेला असतो मात्र चार दिवसांच्या अतिवृष्टीने मोठी तूट भरुन काढली. मात्र 23 ऑगस्ट अखेर शहरात 68 मि.मी.इतका पाऊस सरासरीपेक्षा जास्त ठरल्याने तूट भरुन निघाली आहे.ऑगस्टचे अजून सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे यात आणखी 50 ते 60 मि.मी. पावसाची भर पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.