इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे तहसीलदारांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात 10 ते 15 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत राहुल उध्दव शिंदे (वय 40, ग्राममहसूल अधिकारी बाभुळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुख्यमंत्री सौर उर्जा वाहिनी 2.0 हा प्रकल्प मौजे बाभुळगांव येथील गायरानात प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाचे काम आवादा कंपनी करीत आहे. (Latest Pune News)
सदर ठिकाणी अतिक्रमण केलेले सात ते आठ पत्राशेड आहेत. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी नोटीस बजावत शुक्रवार (ता.22) सकाळी अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडल अधिकारी अशोक पोळ, ग्राममहसूल अधिकारी कालठण नं 2 वैभव मुळे, महसूल सेवक धीर पाडुळे यांच्यासह फिर्यादी आणि आजूबाजूचे गावचे पोलिस पाटील, इंदापुर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आवादा कंपनीचे कर्मचारी हजर होते.
जेसीबी मशिनच्या सहाय्याने अतिक्रमण काढत असताना सदर वस्तीवरील पुरुष, महिला, तरुणांनी जेसीबी समोर उभे राहुन आरडाओरडा करत काम बंद पाडले. त्यानंतर रज्या चौवट्या काळे याने फिर्यादीच्या हाताला धरुन जमावात ढकलले. इंद्रावती रज्या काळे हिने कॉलरला धरुन चापट मारली. शेषराव चैन्या काळे व शालन सचित्र्या पवार, सचित्र्या वाफ्या पवार यांनी तहसिलदार जीवन बनसोडे यांचे अंगावर धावत जावुन त्याचे शर्टाला धरुन शिवीगाळ केली. त्यानंतर वरील लोकांनी मंडल अधिकारी पोळ यांच्यावर दगडफेक केली. त्यात त्यांना मुक्का मार बसला.