

Maharashtra rain alert today district wise update
पुणे: राज्यातील कमी झालेला पाऊस पुन्हा वाढण्याचा अंदाज असून, रविवारी 24 ते 27 ऑगस्ट या चार दिवसांत पुन्हा ’यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागातील पाऊस गत तीन दिवसांपासून कमी झाला होता. मात्र, उत्तर भारतात तुफान पाऊस सुरू असून, गुजरात मध्य प्रदेशातही अतिवृष्टी सुरू आहे. तसेच बंगालच्या उपसागरात वार्याची गती वाढल्याने संपूर्ण विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग अशा सुमारे 20 ते 22 जिल्ह्यांना 24 ते 27 ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नुकताच पाऊस थांबून ऊन पडून पूर ओसरू लागला होता. मात्र, आता पुन्हा चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. (Latest Pune News)
का वाढणार पाऊस...?
पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशावरील हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती तयार झाल्याने 22 ऑगस्ट रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.
तेथे 23 रोजी कमी दाबाचे क्षेत्र त्याच प्रदेशावर होते. पुढील 24 तासांत ते झारखंडमधून पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे.त्यामुळे देशात आगामी चार दिवस पाऊस वाढणार आहे. तसेच उत्तर मध्य-प्रदेश आणि दक्षिण उत्तर-प्रदेशच्या लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरांत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. पंजाब आणि आसामवर चक्रीय स्थिती आहे. 25 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पाऊस 24 ते 29 ऑगस्ट या कालावधीत वाढणार आहे.
या कारणामुळे वाढणार पाऊस......
- पुढील 5 दिवस गुजरात किनार्यावर वारे ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 7 दिवसांत राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.
-प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्रात 24 ते 29 दरम्यान जास्त जोर राहिल
- पश्चिम बंगाल आणि लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्र तयार
-गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानात 24 ते 29 ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (सुमारे 200 ते 400 मि.मी.)
-गत चोवीस तासांत उत्तराखंड, हरियाणा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी 120 ते 200 मि. मी. पावसाची नोंद
-24 ते 27 ऑगस्ट दरम्यान पश्चिम-मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
-कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत 24 ते 28 दरम्यान पाऊस वाढणार
असे आहेत यलो अलर्ट... (कंसात तारखा)
कोल्हापूर घाट, पुणे घाट, सातारा घाट (24 ते 27), ठाणे (26, 27), रायगड (24 ते 27), सिंधुदुर्ग (26), नाशिक घाट (24, 27), पुणे शहर (24), कोल्हापूर शहर (24), परभणी (24, 25), हिंगोली (24, 25), नांदेड (23 ते 25), अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम (23 ते 27), यवतमाळ (24, 25)