

पुणे: सण-उत्सवाची रेलचेल...सांस्कृतिक - धार्मिक कार्यक्रमांचा आनंद...असे चैतन्यमयी वातावरण असलेल्या श्रावण महिन्याला शुक्रवारी (दि. 25) सुरुवात झाली अन् यानिमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण बहरले आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली आणि मंदिरांमध्येही वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. श्रावण महिना म्हणजे सणवार- व्रतवैकल्यांचा.
यंदाही श्रावणात विविध सण साजरे होणार आहेत, तर अनेक योगही जुळून आले आहेत. या वर्षी दहा वर्षांनंतर श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग आलेला असून, 12 ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. (Latest Pune News)
श्रावण महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, श्रावणात पाऊस बरसण्यासह सणासुदींच्या रेलचेलीतून आसमंत चैतन्यदायी आणि प्रफुल्लित होणार आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजनासह हा महिना सण-उत्सवांचा असणार आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती...अशा सणासुदीच्या रेलचेलीतून सगळीकडे आनंद बहरणार आहे.
याशिवाय वास्तुशांती, भूमिपूजन, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्तही गाठता येणार आहे. श्रावण महिन्यात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील दर सोमवारी शिवमंदिरांमध्ये शिवउपासना करण्याची प्रथा आहे. म्हणूनच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शहरातील मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि. 28) मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांना दर्शन घेता येणार आहे आणि यानिमित्ताने भजन-कीर्तनासह विविध कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय श्रावणात लघुरुद्र, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती असे विविध धार्मिक कार्यक्रम-पूजा होणार आहेत. यासाठी गुरुजींकडे दूरध्वनीद्वारे वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी मंगळागौरीचे कार्यक्रम, श्रावण गीतांचे कार्यक्रम, भजन-कीर्तन, प्रवचनांचे कार्यक्रमही होणार आहेत.
तीन मंगळागौर उपवासाच्या दिवशी
29 जुलै रोजी पहिल्या मंगळवारी नागपंचमी आहे. 5 ऑगस्टच्या मंगळवारी पुत्रदा एकादशी, 12 ऑगस्टला मंगळवारी अंगारकी चतुर्थी, 19 ऑगस्टच्या मंगळवारी एकादशी असे उपवासाचे दिवस आहेत.
मंगळागौरीचे पूजन करणार्या काही महिला उपवास करतात. पण, देवतांना उपवास नसतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे भोजनाचा नैवेद्य देवीला अर्पण करता येईल. ज्यांना उपवास आहे त्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत आणि इतरांना भोजन करता येईल. व—त पूजा आणि उद्यापनसुद्धा कोणत्याही मंगळवारी करता येईल, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
श्रावणातील सण आणि विशेष दिवस
नागपंचमी - 29 जुलै
नारळी पौर्णिमा - 8 ऑगस्ट
रक्षाबंधन - 9 ऑगस्ट
अंगारकी चतुर्थी - 12 ऑगस्ट
श्रीकृष्ण जयंती - 15 ऑगस्ट
गोपालकाला - 16 ऑगस्ट
पोळा - 22 ऑगस्ट
श्रावणात काही योग आले आहेत, त्यातीलच एक म्हणजे अंगारकी चतुर्थीचा योग. यंदा श्रावणात 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी आहे. याआधी असा योग 1 सप्टेंबर 2015 मध्ये आलाहोता. यानंतर 8 ऑगस्ट 2028 मध्ये श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थी योग जुळून येणार आहे.
- मोहन दाते, पंचागकर्ते